माजी काँग्रेस खा. सज्जन कुमार यांचा तिहार जेलमध्ये मृत्यू

84 च्या शीख दंगलीत होते दोषी

नवी दिल्ली/20ऑगस्ट : 1984 च्या भीषण शिखविरोधी दंगलीप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेले माजी काँग्रेस खासदार सज्जन कुमार यांचे गुरुवारी वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत असताना त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप रुग्णालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही.
दिल्लीच्या राजकारणात जाट समाजाचा एक मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे सज्जन कुमार हे 31 ऑक्टोबर 1984 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर उसळलेल्या शिखविरोधी दंगलीतील मुख्य चिथावणीखोर असल्याचे दिल्ली पोलिसांच्या तपासात समोर आले होते. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीसह उत्तर भारतात उसळलेल्या दंगलीत हजारो शिख बांधवांची घरे, दुकाने आणि गुरुद्वारे जाळण्यात आले होते. या भीषण हिंसाचारात हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला होता.
विशेष म्हणजे दंगलीच्या घटनेनंतर तब्बल 30 वर्षे सज्जन कुमार यांचे नाव या प्रकरणातून बाहेरच राहिले होते. सुरुवातीला स्थापन करण्यात आलेल्या अनेक तपास आयोगांच्या अहवालातही त्यांचा थेट उल्लेख नव्हता. परंतु, 2015 मध्ये केंद्र सरकारने शिखविरोधी दंगलींच्या जुन्या बंद पडलेल्या फाईल्स पुन्हा उघडण्यासाठी ’विशेष तपास पथक’ स्थापन केले आणि तेथून सज्जन कुमार यांच्याविरोधात कायदेशीर फास आवळला गेला.

Back to top button