मान्सून पून्हा सक्रिय, अमरावतीत रिमझीम, मोर्शीत मुसळधार

-दुबार पेरणीचे संकट टळले, शेतकर्यांना दिलासा
अमरावती / 22 जुलै : गेल्या एक ते दोन आठवड्यापासून गायब असलेला मान्सूनचा पाउस आज मंगळवारपासून अमरावती जिल्ह्यात पून्हा सक्रिय झाला आहे. अमरावती शहरासह जिल्ह्यातील काही भागात आज रिमझीम पावसाने हजेरी लावली तर मोर्शी तालुक्यात मात्र विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाउस कोसळला. पेरणीनंतर पावसाने दिर्घकाळ दडी मारल्याने जिल्ह्यातील शेतकर्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे झाले होते, आजच्या पावसाने ते टळले आहे.
मोर्शी शहरासह तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळल्यामुळे शेतकरी पुन्हा सुखावला आहे. तालुक्यातील हिवरखेड, दापोरी येथे मध्यम तर नेरपिंगळाई येथे मेघगर्जना व विजेच्या कडकडाटासह पाऊस कोसळला. गेल्या दहा दिवसापासून पाउस गायब असल्याने शेतकरी चिंतेत होता, त्यांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला. पावसाअभावी हवामानात उष्णता वाढली होती. उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. डासांच्या प्रादुर्भावामुळे विविध आजारांचे प्रमाणही वाढले होते. आज दुपारी 1 वाजता मोर्शी, अमराावती शहरासह जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात झाली. रात्रीही कुठे हलका तर कुळे राहुनराहुन मुसळधार पाउस पडत होता.
मोर्शीत राधाकृष्ण कॉलनी येथील नाल्या तुडुंब भरल्या. नाल्यांमधील पाणी रस्त्यांवरुन वाहताना दिसत होते. काही नागरिकांच्या घरातही मोठ्या प्रमाणात पाणी शिरले. त्यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले होते. मोर्शी शहरातील काही भागात पाणी काढताना नागरिकांची दमछाक झाली. मोर्शी शहराच्या मध्यभागातून वाहणार्या दमयंती व नळा नदीतूनही बर्यापैकी पाणी वाहताना दिसत आहे. आणखी काही दिवस असाच पाउस सुरु राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील महत्वाच्या प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रातही पाउस पडत असल्याने जलाशयांची पातळी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.




