आई-बाबा माझ्या भविष्याकरिता मतदान करा
स्वीप योजनेंतर्गत विद्यार्थ्यांमार्फत नागरिकांना मतदानाचे प्रभावी आवाहन

अमरावती /8 जानेवारी : लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून आगामी अमरावती महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी लक्षणीयरीत्या वाढावी, या उद्देशाने अमरावती महानगरपालिकेच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण व प्रभावी जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांच्या मालिकेत स्वीप (डूीींशारींळल तेींशीी’ एर्वीलरींळेप रपव एश्रशलीेींरश्र झरीींळलळरिींळेप) योजनेंतर्गत आई-बाबा माझ्या भविष्याकरिता मतदान करा हा अभिनव व भावनिक उपक्रम राबविण्यात येत आहे. अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची सुरुवात मनिबाई गुजराथी हायस्कूल, अंबापेठ येथून करण्यात आली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या पालकांपर्यंत थेट मतदानाचा संदेश पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.लोकशाहीची खरी ताकद ही मतदारांच्या सहभागात असून मतदान हा प्रत्येक पात्र नागरिकाचा हक्क आणि कर्तव्य आहे. मात्र, विविध कारणांमुळे अनेक नागरिक मतदान प्रक्रियेत सहभागी होत नाहीत. ही मानसिकता बदलण्यासाठी आणि मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग हा अत्यंत प्रभावी माध्यम ठरत आहे. या उपक्रमांतर्गत अमरावती महानगरपालिका परीक्षेत्रातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना संदेश देण्यात येणार असून, आई-बाबा माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मतदान करा असे आवाहन करून ते आपल्या पालकांना मतदानासाठी प्रेरित करणार आहेत.




