विदेशात मोदीजींची भेट, भारावले चांदुर बाजारचे तातेड कुटुंब
सायप्रसमध्ये प्रत्यक्ष संवाद

-चिमुकल्या समकितला कडेवर घेंतले
चांदूरबाजार / 16 जून:युरोपमधील सायप्रस या छोट्याशा देशातील लिमासोल शहरात आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या दौर्यानिमितत पोहोचले. येथे सुमारे 4 ते 5 हजार भारतीय राहतात. त्यांनी पंतप्रधानांचे वंदे मातरमचा जयघोष करित उत्साहात स्वागत केले. या भारतीयांमध्ये चांदूर बाजार येथील तातेड कुटुंबही सहभागी होते. त्यांना यानिमित्ताने नरेंद्र मोदी यांच्याशी अगदी जवळून संवाद साधण्याची संधी मिळाली. या भेटीने तातेड कुटुंब भारावून गेले होते.
चांदूर बाजार येथील भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते व माजी तालुका अध्यक्ष चंद्रशेखर लालचंदजी तातेड यांचे सुपुत्र प्रशम तातेड हे गेल्या 7 वर्षांपासून सायप्रसमधील एका बहुराष्ट्रीय कंपनीत कार्यरत आहेत. आपल्या मोठ्या भावाला भेटण्यासाठी व सुट्टी घालविण्याकरिता 8 दिवसांपूर्वीच प्रेरित तातेड हे देखील कुटुंबासह या सुंदर देशात गेले होते. आज त्यांना मोदीजींना प्रत्यक्ष, अगदी जवळून भेटून संवाद साधता आला. यावेळी नरेंद्र मोदी यांनी प्रशम तातेड यांचा चिमुकला समकित याच्या डोक्यावर हात ठेवून शुभाशिर्वाद दिला. त्यानंतर त्यांनी समकितला कडेवर घेतले. चलो इंडिया म्हणत पंतप्रधानांनी समकितला गोंजारले.
प्रेरित तातेड यांची कन्या संयती हिच्या गालावर व डोक्यावर हात फिरवून तिचाही लाड केले. जेव्हा प्रेरित तातेड यांनी मोदीजींना वाकून नमस्कार केला, तेव्हा त्यांनी त्यांना त्वरित उचलून खांद्यावर हात ठेवून स्नेहयुक्त आशीर्वाद दिला. प्रशम तातेड यांनी मोदींना म्हणाले की, आम्ही आपल्यावर खूप प्रेम करतो. त्यानंतर जोरात जय जिनेंद्र मोदीजी असा नारा त्यांनी दिला. तेव्हा मोदीजींनीसुद्धा मोठ्या आवाजात जय जिनेंद्र म्हणत प्रतिसाद दिला. तातेड कुटुंबातील दोन्ही सूनबाई सौ. शिवाली व सौ. सुरभी यांचे अभिवादनही मोदीजींनी अत्यंत आत्मीयतेने स्वीकारले आणि त्यांच्या बुकवर स्वाक्षरीही केली. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या विदेशात झालेल्या भेटीने आम्ही भावविभोर व गौरवान्वित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया चांदूर बाजारच्या तातेड कुटुंबातील सदस्यांनी व्यक्त केली आहे .