अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा
नियोजन भवनात आयोजन

अमरावती /18 डिसेंबर : अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्कांची जाणीव व्हावी, त्यांना याबाबत माहिती मिळावी यासाठी दरवर्षी 18 डिसेंबर रोजी ’अल्पसंख्याक दिवस ’ साजरा करण्यात येतो. अल्पसंख्यांक हक्क दिवसाचे औचित्य साधून आज नियोजन भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नगर प्रशासन सहाय्यक आयुक्त विकास खंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे, कौशल्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रांजली बारस्कर, योजना शिक्षणाधिकारी राजेश वरखडे, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी इम्रान खान, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गायकवाड, पोलीस उपअधीक्षक राजेश भोयर यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य अल्पसंख्यांक आयोगामार्फत अल्पसंख्यांकांसाठी शासनाने राबविण्यात येणार्या योजनांची माहिती अल्पसंख्यांक समाजातील नागरिकांना व्हावी, हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. सहाय्यक आयुक्त श्री. खंडारे यांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत विविध योजना उपक्रम राबविले जातात. त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांच्या घटनात्मक व कायदेशीर हक्काची जाणीव व्हावी यासाठी हा दिवस साजरा करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती भाकरे यांनी अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी शासनामार्फत राबविण्यात येत असणार्या योजना, विविध उपक्रम, शिष्यवृत्ती याबाबत माहिती दिली. सहाय्यक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी कौशल्य विभागामार्फत राबविण्यात येणार्या विविध योजना, प्लेसमेंट ड्राईव्ह याबाबत माहिती दिली. यावेळी शिक्षकवृंद, विद्यार्थी, संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार आपत्ती व्यवस्थापन विभागाचे सुरेंद्र रामेकर यांनी मानले.




