18 वर्षीय युवतीसह मध्यमवयीन पुरुषाने घेतला गळफास

अमरावतीत दोन आत्महत्या

अमरावती / 11 सप्टेंबर : अमरावती शहरात एका दिवसात दोन आत्महत्यांच्या घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. यामध्ये 18 वर्षीय तरुणीने तर 55 वर्षीय पुरुषाने आजारपण आणि व्यसनाला कंटाळून आपले जीवन संपवले.
पहिली धक्कादायक घटना समृद्धी हाइट्स, मंगलधाम कॉलनी येथे घडली. तन्वी अरविंद डोंगरे (वय 18) ही अरविंद काशिनाथ डोंगरे (वय 50) यांची मुलगी होती. तन्वीला दीर्घकाळ मायग्रेनचा त्रास होता. वारंवार तिला दवाखान्यात दाखल करावे लागत असे. काही दिवसांपासून तिची तब्येत अधिकच बिघडली होती. 10 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ती आपल्या बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून लटकलेली आढळली.
कुटुंबीयांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. फ्रेजरपुरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. तन्वीचा कोणाशीही वाद नव्हता, ती मोबाईल वापरत नव्हती. मायग्रेनच्या असह्य त्रासामुळेच तिने टोकाचे पाऊल उचलले असावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दुसरी घटना व्यंकय्यापुरा भागात घडली. गौतम विठ्ठल साखरे (वय 55) यांनी दारूच्या आहारी गेल्यामुळे उद्भवलेल्या आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली. मृतक यांना काही दिवसांपूर्वी ‘पंडू’ रोग झाल्याने पीडीएमसी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच त्यांना दवाखान्यातून सुट्टी मिळाली होती. दहा सप्टेंबरच्या मध्यरात्री ते आपल्या घरी झोपी गेले होते. सकाळी कुटुंबीयांनी पाहिले असता त्यांनी खिडकीच्या ग्रीलला दुपट्ट्याने गळफास घेतलेला दिसले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरे तपासणीसाठी पाठवला. अमरावतीत एका दिवसात घडलेल्या या दोन आत्महत्या घटनांनी समाजात खळबळ उडाली आहे. विशेषतः अल्पवयीन तन्वीच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button