मेळघाटच्या पद्मश्री कोल्हे दाम्पत्याला आरोग्य भूषण पुरस्कार जाहीर

19 ऑक्टोबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्याहस्ते गौरव

धारणी/ 16 ऑक्टोंबर -पद्मश्रीचा बहुमान आणि अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित मेळघाटचे डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे यांना महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र आरोग्य भूषण पुरस्कार – 2025 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान केला जाणार आहे. या घोषणेमुळे त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदनाचा वर्षाव सुरु झाला आहे. 2025 चा हा पुरस्कार डॉ. रवि व डॉ. स्मिता कोल्हे यांना प्रदान करण्याची माहिती संयोजक उमेश चव्हाण (प्रथम आरोग्य साहित्य संमेलन), अध्यक्ष अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ पुणे तसेच आयएमए महाराष्ट्रचे सहसंयोजक अविनाश भोंडवे यांनी एका पत्राद्वारे दिली आहे. पुणे येथील प्रथम आरोग्य साहित्य संमेलन 2025 बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित असून, पुरस्कार सोहळा 19 ऑक्टोबर रोजी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे.

या प्रसंगी आरोग्य महोत्सवानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिरही आयोजित करण्यात आले आहे. शिबिरात मोफत तपासणी व उपचार केले जातील, तसेच दिव्यांगांना कृत्रिम हात व पायाचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते होईल. कॅन्सर, घुडगा तपासणी, मेंदू रोगावर उपचार, हृदयरोग तपासणीसह सर्व प्रकारच्या रोगांची तपासणी व उपचारही येथे केले जातील.

डॉ. रवि कोल्हे यांनी सांगितले की, मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात आदिवासींचे जीवन अत्यंत खडतर असल्यामुळे आरोग्य, शेती, वाहतूक, वीज आणि रस्त्यांसारख्या विषयांवर शासनाने भरपूर काम केले आहे, तरीही अजून बरेच काम करावे लागणार आहे. पुरस्काराबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानताना, डॉ. स्मिता कोल्हे यांनी मेळघाटातील अतिवृष्टीसह इतर समस्या त्यांना सांगण्याची तयारी दर्शविली. अध्यक्ष मेघराजराजे भोसले यांनी कोल्हे दाम्पत्यांना पुरस्कार सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button