बनावट नोटा प्रकरणातील सूत्रधाराला अटक

आदित्य रामेकर दर्यापूरमध्ये मावशीच्या घरून ताब्यात

* आदित्यवर चार वर्षांपूर्वी  मुंबईत ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा
* बनावट नोटांचा व्यवसायही केला सुरु

अमरावती / 17 ऑक्टोबर – नांदगाव पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी रात्री उघडकीस आलेल्या बनावट नोटा प्रकरणातील सूत्रधार आदित्य रामेकर याला गुरुवारी रात्री दर्यापूर येथील कंबोडी गावातून अटक करण्यात आली. तो कंबोडी गावात आपल्या मावशीच्या घरी लपून बसला होता. तांत्रिक तपास आणि खबर्‍यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याचा शोध घेत अखेर त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आदित्य रामेकरला दर्यापूरहून अमरावतीला आणण्यात आले असून, त्याच्यासह या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या इतर तीन आरोपींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. बनावट नोटा कुठून आणल्या आणि त्याचे कोणाशी संबंध आहेत याचा तपास सुरू आहे. घटनेचा तपशील असा की, 14 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास रहाटगाव चौकातील हर्ष वाईन शॉपमध्ये तीन जण दारू खरेदी करण्यासाठी आले होते. त्यांनी दारूच्या बदल्यात दुकानदाराला बनावट नोटा दिल्या. हे लक्षात येताच दुकानदाराने तत्परतेने त्या तिघांना पकडले आणि नांदगाव पेठ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून संचित अरविंद चव्हाण (20, मिलिंद नगर, रहाटगाव), दीपक बाबूलाल खंदारे (32, पंचशील नगर, रहाटगाव) आणि संघरत्न उर्फ सोनू राजेंद्र मोटघरे (36, जुनी वस्ती, रहाटगाव) या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून सुमारे 27,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. चौकशीत त्यांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा बाळगल्याची कबुली दिली आणि गेल्या आठवड्यापासून रहाटगाव आणि नांदगाव पेठ परिसरात त्या फिरवत असल्याचे उघड झाले. या आरोपींना रहाटगाव परिसरात हळूहळू बनावट नोटा फिरवण्याचे काम सोपवण्यात आले होते आणि सर्व काही सुरळीत पार पडल्यास पुढील स्तरावर जाण्याची योजना होती. चौकशीतून पोलिसांना या बनावट नोटांची खेप पुरवणाऱ्या व्यक्तीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटमागील सूत्रधार आदित्य रामेकरचा जोरदार शोध सुरू केला. अखेर तो दर्यापूर तालुक्यातील कंबोडी गावात आपल्या मावशीच्या घरी लपल्याचे समजल्याने पोलिस पथकाने छापा टाकून त्याला अटक केली.

लक्षात घेण्यासारखे म्हणजे, आदित्य रामेकरवर सुमारे चार वर्षांपूर्वी मुंबईत ऑनलाइन फसवणुकीचा आरोप ठेवण्यात आला होता. त्यानंतर त्याने ऑनलाइन फसवणुकीसह बनावट नोटा चलनात आणण्यास सुरुवात केली होती. अखेर अमरावती पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आता पोलिस त्याने बनावट नोटा कुठून आणल्या आणि किती रकमेच्या नोटा चलनात आणण्यासाठी पुरवल्या याचा तपास करत आहेत. ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे आणि सहाय्यक पोलिस आयुक्त कैलाश पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांच्या नेतृत्वाखाली पोहेकन राजाभाऊ राऊत, पोकन राजिक खान, नीलेश सावकर, राजा सय्यद, वैभव तिखिले आणि अमित ढोले यांच्या पथकाने केली.

 

संबंधित बातम्या

Back to top button