सौर ऊर्जेच्या सरकारी धोरणांविरुद्ध धडक मोर्चा
व्यावसायिकांना जुन्या सवलती मिळाव्यात हीच मागणी

* मोर्चामध्ये सौर संच विक्रेते, तंत्रज्ञ व ग्राहक सहभागी
अमरावती / 5 मार्च : सौर ऊर्जेच्या सरकारी धोरणात झालेल्या अचानक बदलाने अमरावती जिल्ह्यातील सौर व्यावसायिक आणि ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शासनाने लादलेल्या जाचक अटी आणि अनुदानातील कपात मागे घ्यावी या मागणीसाठी आज अखिल भारतीय नवीकरणीय ऊर्जा संघटनेच्या वतीने कडक ऊन्हातही एक जंगी मोर्चा काढण्यात आला. कठोरा नाका येथून निघालेला हा जनसमुदाय घोषणाबाजी करत महावितरण कार्यालयावर धडकला. यावेळी आशीष पेठे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन वीज कंपनीच्या अभियंत्यांना सुपूर्द केले. शासनाचे नवे धोरण म्हणजे सौर उद्योगाच्या गळ्याला नख लावण्यासारखे असून, यामुळे 60 टक्क्यांहून अधिक ग्राहकांना फटका बसणार असल्याचे संघटनेने म्हटले आहे. पीएम सूर्यघर योजनेतील अनेक कामे या निर्णयामुळे रद्द होण्याची भीती असून, सामान्य जनतेचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
मोर्चामध्ये सौर संच विक्रेते, तंत्रज्ञ आणि ग्राहक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जोपर्यंत जुन्या अटी आणि अनुदानाची पद्धत पूर्ववत केली जात नाही, तोपर्यंत हा लढा असाच सुरू राहील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. या आंदोलनामुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते, मात्र पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
धोरणाचा घाव ग्राहकांवर
सरकारने सौर ऊर्जेच्या नियमात बदल केल्याने सामान्य माणसाचे बजेट कोलमडले आहे. नव्या अटींमुळे अनुदान मिळणे कठीण झाले असून ग्राहकांमध्ये गोंधळ वाढला आहे. यामुळेच आज व्यापार्यांसह सर्वसामान्यांनी रस्त्यावर उतरून प्रशासनाचा निषेध केला आहे.




