डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यालयात मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

अमरावती /27 फेब्रुवारी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, फ्रेजरपुरा, अमरावती येथे आज दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, डॉ डॉ. बाबासाहेब आंबेडकर, विष्णू वामन शिरवाडकर तसेच श्री दादासाहेब गवई यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले. मुख्याध्यापक श्री. प्रवीण घोंगडे तसेच सर्व शिक्षकवृंद कार्यक्रमास उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजावून सांगत मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी मराठी भाषेवर सुंदर आणि प्रभावी भाषणे केली तसेच काही विद्यार्थ्यांनी कविता सादर केल्या. माही गजभिये हिने आत्मविश्वासाने संचालन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम व जाणीव अधिक दृढ झाली. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.




