जिल्ह्यातील नुकसानीचे सरसकट पंचनामे करा

जिल्हातील अतिवृष्टी बाधित पिकांची केली पाहणी

* आ.संजय खोडके यांचे अमरावती जिल्हाधिकार्‍यांना पत्र

अमरावती /25 सप्टेंबर : अमरावती जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत आमदार संजय खोडके यांनी अमरावती जिल्हाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सतत पाऊस पडल्याने चांदूरबाजार, अचलपूर भागातील खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार संजय खोडके यांनी जिल्ह्यातील हिरूळपूर्णा, आंसेगांव पूर्णा, कारंजा बहिरम आदी भागात पाहणी करून शेतकरी बांधवांशी संवाद साधला. जिल्ह्यात बर्‍याच भागात अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील कापूस, सोयाबिन तसेच संत्रा पिकांना प्रचंड फटका बसला असून ऐन उमेदीच्या दिवसात हातून आलेली उभी पिके निघून गेल्याचे शेतकर्‍यांनी वेदनादायी स्वरूपात व्यक्त केले.

दरम्यान आमदार संजय खोडके यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता असे निदर्शनास आले की, सदर भागात ढगफुटीची स्थिति नसली तरी अतिवृष्टी झाल्याने शेतातील उभी पिके बाधित झाली आहेत. हिरूळपूर्णा, आंसेगांव पूर्णा, कारंजा बहिरम अशा भागातील कापूस पिकांचे 100 टक्के नुकसान झाले आहे. बर्‍याच गावांमध्ये पर्जन्यमान मापक केंद्र नसल्यामुळे सरासरी पावसाची नोंद मिळत नाही, त्यामुळे सरसकट नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. शेतकर्‍यांचे झालेले नुकसान पाहता आमदार संजय खोडके यांनी कृषी मंत्री महोदयांसोबत दूरध्वनीवरून चर्चा केली. जिल्ह्यातील बर्‍याच गावांमध्ये पर्जन्यमापक यंत्र उपलब्ध नसल्यामुळे सरासरी किती पाऊस पडला याचे अचूक नोंदी घेणे शक्य नाही, त्यामुळे सरसकट नुकसानीच्या निकषांमध्ये बदल करून तात्काळ पंचनामे करण्याची गरज आहे.

अमरावती जिल्ह्यात सर्वच पिकांचे 100 टक्के नुकसान झाल्यामुळे सदर भागात सरसकट नुकसानीचे संपूर्ण पंचनामे करण्यासाठी शासनाचे आदेश प्राप्त करण्यासाठी अमरावती जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, तसेच शासनाचे आदेश प्राप्त करून तलाठी व सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरसकट नुकसानीचे पंचनामे व अहवाल सादर करण्याची कार्यवाही तातडीने करण्यात यावी, अशी मागणी आमदार संजय खोडके यांनी पत्रातून केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button