महापालिकेच्या कचरा कंत्राटदाराला मोठा दणका

कोर्णाक इन्फ्रास्ट्रक्चरला साडे नऊ लाखांचा दंड

कामगारांची सुरक्षा आणि कागदपत्रांच्या त्रुटींमुळे कारवाई

अमरावती/16 मार्च – महानगरपालिका क्षेत्रात घनकचरा संकलन आणि स्वच्छतेचे काम पाहणार्‍या ‘मेसर्स कोर्णाक इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’ या कंपनीला प्रशासनाने मोठा दणका दिला आहे. करारातील अटी व शर्तींचे वारंवार उल्लंघन केल्याप्रकरणी या कंत्राटदारावर 9 लाख 65 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. स्वच्छता विभागाने केलेल्या विशेष पाहणीत वाहनांच्या कागदपत्रांचा अभाव आणि कामगारांच्या सुरक्षेकडे केलेले अक्षम्य दुर्लक्ष समोर आले असून, शहराच्या आरोग्याशी खेळणार्‍या कोणत्याही त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा सज्जड इशारा या कारवाईतून देण्यात आला आहे.
प्रशासनाने 1 ते 13 मार्च 2026 दरम्यान केलेल्या तपासणीत कचरा वाहतूक करणार्‍या वाहनांकडे चालक परवाना, नोंदणी प्रमाणपत्र आणि विमा यांसारखी आवश्यक कागदपत्रे आढळली नाहीत. या तांत्रिक त्रुटींसोबतच अत्यंत गंभीर बाब म्हणजे, घनकचरा व्यवस्थापनासारख्या संवेदनशील कामात गुंतलेल्या कामगारांना गणवेश, सुरक्षा बूट, हातमोजे आणि ओळखपत्र यांसारखी किमान सुरक्षा साधनेही पुरवण्यात आली नव्हती. या सुरक्षाविषयक त्रुटींसाठी 7 लाख 15 हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तसेच, शहरातील विविध प्रभागांमध्ये जसे की शेगाव-राहाटगाव आणि विलासनगर परिसरात 14 मार्चपासून काम सुरू करण्याचे निर्देश असूनही कंत्राटदाराने तिथे मनुष्यबळ आणि यंत्रणा पुरवली नाही. या कामातील हलगर्जीपणाबद्दल अतिरिक्त 2 लाख 50 हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. अतिरिक्त आयुक्तांच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालानंतर ही कडक कारवाई निश्चित करण्यात आली असून, कंत्राटदाराने तात्काळ सुधारणा न केल्यास पुढील कारवाई अधिक कठोर असेल असे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button