महावितरणचा लाचखोर सहाय्यक अभियंता निलंबित
मुख्य अभियंत्यांनी केली कारवाई

-वरुड येथील प्रकरण
अमरावती / 18 जुलै : वीज ग्राहकाकडून रिलिज ऑर्डर काढण्याकरिता लाख स्विकारताना रंगेहात अटक झालेल्या वरुड उपविभाग-2 मधील सहाय्यक अभियंत्यांस महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. वरुड पोलिस ठाण्यात याप्रकरणी 5 जुलै रोजी गुन्हा दाखल झाला होता. अमरावती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार महावितरणच्या मुख्य अभियंत्यांनी ही कारवाई केली आहे.
नेट मिटर बसविण्याकरीता रिलीज ऑर्डर काढण्यासाठी लाचेची मागणी करणे आणि लाचलूचपत विभागाने रचलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाच स्विकारल्याप्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल होऊन अटक होणे, हे दोन्ही कृत्य महावितरणची जनसामान्यातील प्रतिमा मलिन करणारे आहे. त्यामुळे वरुड उपविभाग-2 मध्ये कार्यरत या सहाय्यक अभियंत्याला महावितरणच्या सेवेतून निलंबित करण्यात आले असल्याचे महावितरणने कळविले आहे.
सहाय्यक अभियंता वरूड-2 उपविभाग यांच्याविरोधात सोलर कृष्णा सोल एजंसीचे संचालक दिलीप शंकरराव खेरडे यांनी तक्रार दाखल केली होती. दिलीप खेरडे यांना विक्रांत झामडे आणि सुनिता झामडे यांच्या घरी प्रत्येकी दोन किलोवॅटचे रूफ टॉपसाठी नेट बसवायचे होते. त्यासाठी त्यांना रिलीज ऑर्डर काढण्याकरीता या सहाय्यक अभियंत्याने लाचेची मागणी केली होती. खेरडे यांच्या तक्रारीवरुन लाचलुचपत विभागाने केलेल्या सापळा कारवाई दरम्यान लाच स्विकारल्याप्रकरणी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाअंतर्गत पोलीस स्टेशन वरूड येथे (दि.5 जुलै) गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती.
महावितरणच्या कामासाठी लाच मागणे आणि लाच स्विकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक होणे ही सहाय्यक अभियंता यांची दोन्ही कृत्ये अत्यंत गंभीर स्वरूपाची आहेत. त्यांनी महावितरण सेवाविनिमय 2005 च्या तरतुदींचा भंग केला आहे. त्यामुळे सहाय्यक अभियंता यांना महावितरणच्या सेवेत राहू देणे, हे महावितरणच्या हितसंबंधास आणि कामकाजात बाधा निर्माण करणारे असल्याने महावितरणकडून ही निलंबनाची कारवाई करण्यात आली असल्याचे महावितरणने कळविले आहे.




