बीजेपीकडून टाळ्या मिळवण्यासाठी महाराष्ट्राची नालस्ती

बळवंत वानखडेंचा खा. मस्केंवर पलटवार

-महाराष्ट्राचा अपमान करत असल्याची टीका
अमरावती / 11 सप्टेंबर : जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे यांनी शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत पलटवार केला आहे. उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडीया आघाडीचे मत फोडल्याचा दावा मस्के यांनी केला होता. त्याला प्रत्युत्तर देताना वानखडे म्हणाले की, मस्के हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेत्यांची वाहवा मिळवण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी करत आहेत.
वानखडे म्हणाले की, उपराष्ट्रपती निवडणुकीत इंडीया आघाडीकडे बहुमतच नव्हते. त्यामुळे विजयाची आशा नव्हती, तरीसुद्धा मस्के निराधार वक्तव्य करीत आहेत. भारत हा विविध पक्षांनी मिळून उभा असलेला अखंड देश आहे. लोकसभा आणि राज्यसभेत वेगवेगळ्या पक्षांचे खासदार असतात. अशा परिस्थितीत बेबंद आरोप करून राज्याची प्रतिमा मलिन करणे योग्य नाही, असे मत वानखडे यांनी नोंदवले.
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या बुधवारी झालेल्या दीर्घ भेटीवरही वानखडे यांनी मत व्यक्त केले. त्यांनी या भेटीचे स्वागत करताना म्हटले की, ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणे ही आनंदाची बाब आहे. कुटुंब एकत्र येणे हे चांगले लक्षण आहे. भविष्यात राजकीय समीकरणांबाबतचा निर्णय वरिष्ठ नेते करतील. मात्र ठाकरे बंधू एकत्र येणे यात काहीही चुकीचे नाही, असे वानखडे यांनी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

Back to top button