न्यायालयात बत्ती गुल; जज, वकील व पक्षकार हैराण

लिफ्ट थांबली, संगणक ठप्प

-महिन्यात चौथ्यांदा कामकाज ठप्प
-लोकनिर्माण विभागाने ‘हात झटकले’
अमरावती / 16 सप्टेंबर : अमरावती जिल्हा न्यायालय परिसरात आज पुन्हा अनेक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने न्यायालयाचे कामकाज ठप्प झाले. दुपारी 11.30 वाजता गेलेली लाईट तीन-चार तास परत न आल्याने न्यायमंदिरातील अर्ध्याहून अधिक कोर्टातील खटल्यांची सुनावणी अडकली. या अनपेक्षित खंडित वीजपुरवठ्यामुळे न्यायाधीश, वकील आणि न्याय मिळण्यासाठी आलेले पक्षकार हैराण झाले. दिवसभर पावसाळी हवामानामुळे परिसरात सफोकेशन तयार झाल्याची तक्रार अनेकांनी मांडली.
याबद्दल कोर्टातील वकिलांनी नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही पक्षकारांना न्याय मिळावा यासाठी लढतो, पण लाईट जाण्यामुळे जेवढा कामकाजाचा बळी जातो, त्याबाबत आमचा न्याय कोण करणार? पक्षकारांनी देखील संताप व्यक्त करत सांगितले की, आधीच खटल्यांच्या सुनावणीत तारीख पे तारीख अशी परिस्थिती. त्यात आता कोर्टात आलो तर वीज नसल्यामुळे पुन्हा त्रास सहन करावा लागतो. नवीन सात मजली भव्य न्यायालयीन इमारतीत लाईट गेल्याने लिफ्ट थांबल्या. त्यामुळे न्यायाधीशांनाही कोर्टात जाणे अडचणीचे झाले. संगणक बंद पडल्याने संपूर्ण डिजिटल कामकाज कोलमडले. कोर्ट परिसराच्या मागे मोठा बिघाड झाल्याने त्याची दुरुस्ती होण्यासाठी किमान चार तास लागल्याने वीज पूरवठा खंडित झाल्याची माहिती मिळाली.
लोकनिर्माण विभागाने न्यायालयीन इमारत बांधून विधी व न्याय विभागाकडे सुपूर्द केली आहे. मात्र इमारतीच्या देखभालीसाठी खर्चाचा कोणताही प्रावधान नसल्याने हा विभाग जबाबदारीकडे पूर्णत: दुर्लक्ष करत असल्याचा आरोप न्यायालयीन सूत्रांनी केला. अमरावतीच्या नवीन न्यायमंदिरासह शेजारील अ‍ॅडहॉक कोर्ट मिळून एकूण 48 कोर्ट कार्यरत आहेत. दररोज हजारो प्रकरणांची सुनावणी होते. सुमारे 1,500 हून अधिक लोक रोज या इमारतीत वावरतात. त्यामुळे विजेअभावी प्रचंड गैरसोय तर होतेच, शिवाय श्वसनास त्रासदायक वातावरण तयार होऊन लोकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या एका महिन्यात या न्यायालयात चार वेळा तासन्तास वीजपुरवठा बंद राहिला आहे. नुकत्याच गुरुवार-शुक्रवारीही अशाच प्रकारे लाईट गेलेली होती, ज्यामुळे महत्त्वाच्या सुनावण्यांवर परिणाम झाला.

संबंधित बातम्या

Back to top button