आयुष्यमान संपले, ऐतिहासिक रेल्वे उड्डाणपूल धोकादायक
रेल्वे विभागाच्या सुचनेनंतर वाहतूक बंद

-केवळ दुचाकी व हलक्या वाहनांनाच मुभा
-लवकरच पाडकाम आणि नव्याने पुर्नबांधणी
अमरावती / 23 जुलै : 1963 सालापासून शहराच्या हृदयस्थानी उभ्या असलेल्या अमरावती-बडनेरा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाचे आयुष्यमान संपले असून हा पूल आता जर्जर झाला आहे. या उड्डाणपूलाची सध्याची स्थिती पाहता पूल वाहतूकीसाठी धोकादायक असल्याचे रेल्वे विभागाने अमरावती सार्वजनिक बांधकाम विभागाला एका पत्राद्वारे कळविले आहे. त्यानंतर तब्बल पाच दशकांपासून अमरावतीकरांच्या सेवेत असलेला हा उड्डाणपूल आज सायंकाळपासून जड वाहनांच्या वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. केवळ दुचाकी, ऑटो आणि हलक्या कार चालकांना पुलाच्या वापरासाठी मुभा राहणार आहे.
लवकरच या रेल्वे उड्डापूलाच्या पाडकामाला सुरुवात होणार असून याच जागेवर नवीन उड्डाणपूलाची निर्मिती केली जाणार आहे. राजकमल चौकातून रेल्वे स्थानक, जयस्तंभ चौक आणि हमालपूरा भागाकडे जाण्यासाठी 50 वर्षांपूर्वी हा उड्डाणपूल बांधण्यात आला होता. आज बांधकाम विभागाने पूल बंद करण्याची सूचना दिल्यानंतर पूलावर प्रवेश करणार्या चारही मार्गांवर पोलिसांनी बॅरिकेट्स उभारुन जड वाहनांसाठी वाहतूक बंद केली. सर्व ठिकाणी सुरळित रहदारीसाठी पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. पोलिसांकडून वाहनचालकांना सुचना देण्याचे काम केले जात होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाने या रेल्वे उड्डाणपूलाचे संरक्षणात्मक लेखा परिक्षण सुरु केले आहे. प्राथमिक अहवालानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या उड्डाणपूलाच्या स्टिलगर्डर्सला जंग चढला आहे. तसेच डेक स्लॅबमध्ये अनेक ठिकाणी फ्लेक्सरल आणि शिअर क्रॅकिंग झाल्याने डेक स्लॅब आणि स्टील गर्डर्सना आधार देणार्या अब्टमेंटमध्ये गळीती होवून पूलाचा ढाचा नाजूक बनल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पुलामधील कमकुवत घटकांवरील ताण कमी करण्याकरिता पुलावरुन दुचाकीसारखी हलकी वाहने वगळता अन्य सर्व जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, तसेच पर्यायी मार्गाचे नियोजन करण्यात यावे, अशी शिफासर आणि विनंती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोलिस विभागाकडे पत्राद्वारे केली होती.
त्याची तातडीने अंमलबजावणी करुन पोलिस प्रशासनाने सायंकाळी पूलाच्या सर्व मार्गांवर बॅरिकेट्स लावून वाहतूक बंद केली. आजपासून या उड्डाणपूलावर दुचाकी, ऑटो, कार या वाहनांनाच प्रवेश राहील. तर मालवाहू ट्रक, 407, मिनीडोअर, टिप्पर, लहान ट्रक, तसेच सर्व प्रकारच्या बसेसना या उड्डापूलावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे. वाहतूकीसाठी पर्यायी मार्गांचे नियोजन करण्यात आले आहे.
-पर्यायी मार्गांचे नियोजन
जड वाहनांना उड्डाणपूलाऐवजी पर्यायी मार्गाचे नियोजन पोलिस प्रशासनाने वाहतुकीसाठी केले आहे. त्यानुसार हमालपूराकडून येणार्या वाहनांना बसस्थानक, रेल्वे स्टेशन, इर्विन शवागार असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. बसस्थानकाकडून येणार्या जड वाहनांसाठी बस स्थानक, रेल्वे स्टेशन, इर्विन शवागार टी पॉइंट या मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. राजकमल चौक व जयस्तंभ चौकातून पुलावर येणार्या जड वाहनांना राजापेठ पोलिस स्टेशन, राजकमल चौक, जयस्तंभ चौक, मालविय चौक या मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
-…अन्यथा कायदेशीर कारवाई
शहराच्या मध्यभागी असलेल्या या रेल्वे उड्डाणपूलावरील वाहतूक बंद करण्यासंदर्भात अमरावती पोलिस विभागाने आज एक अधिसूचना जारी केली. त्यात आज 23 जुलैच्या रात्री 8 वाजतापासून पुलावरील जड वाहनांची वाहतूक बंद करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आवश्यक उपाययोजना केल्यानंतर उड्डाणपूल वाहतूकीसाठी पूर्ववत सुरु करण्याबाबतचे पत्र प्राप्त होईपर्यंत हा आदेश लागू राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणार्या वाहनचालकांवर कायदेशिर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यालयातील पोलिस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी कळविले आहे.




