16 कंट्रोल दुकानदारांचे परवाने रद्द
20 लाखांहून अधिक दंड वसूल

-जिल्यातील सर्वात मोठी कारवाई
-1561 रेशन दुकाने तपासली
अमरावती / 12 सप्टेंबर : जिल्ह्यातील शासकीय उचित मूल्य दुकाने म्हणजेच कंट्रोल दुकाने लाभार्थ्यांना धान्य व आवश्यक वस्तू पुरविण्याच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, अनेक ठिकाणी होत असलेल्या गडबडीनंतर जिल्हा पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला असून तब्बल 16 दुकानदारांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. तर 52 दुकानदारांकडून 20 लाख 14 हजार 165 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत जिल्ह्यात 1916 कंट्रोल दुकाने कार्यरत आहेत. या माध्यमातून अंत्योदय गटातील सुमारे 1.28 लाख व प्राधान्य गटातील 3.74 लाख कार्डधारकांना दरमहा गहू, तांदूळ तसेच इतर जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जाते. या प्रचंड प्रमाणावरील व्यवस्थेमुळे काटेकोर नियंत्रण व नियमित तपासणी आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत पुरवठा विभागाने 1561 दुकानांची तपासणी केली. यामध्ये 35 दुकानदारांकडून किरकोळ दोष आढळले, एका दुकानात मध्यम गडबडी नोंदली गेली, तर 16 दुकानांत गंभीर गडबडी उघडकीस आल्या. त्यामुळे या 16 दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. एका दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला आहे.
गडबडी आढळलेल्या दुकानदारांकडून दंडात्मक कारवाई म्हणून एकूण 20 लाख 14 हजार 165 रुपयांची वसुली करण्यात आली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी निनाद लांडे यांनी सांगितले की, कंट्रोल दुकाने ही थेट विभागाच्या नियंत्रणाखाली आहेत. लाभार्थ्यांकडून येणार्या तक्रारींवर तात्काळ कारवाई केली जाते व नियमभंग करणार्यांना कुठल्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. जिल्हा प्रशासनाने केलेल्या या धडक कारवाईमुळे कंट्रोल दुकानदारांमध्ये एक प्रकारची धाक निर्माण झाला असून, लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य व इतर वस्तू मिळाव्यात यासाठी ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे संकेत दिले जात आहेत.




