मिर्झांच्या सामाजिक सौहार्दाच्या शिकवणीला समाजात रुजवू या !
‘हास्यसम्राट’च्या मान्यवरांची उपस्थिती

अमरावती /30 नोव्हेंबर : महाराष्ट्राचे हास्य सम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या काव्य प्रतिभेच्या 50 वर्षाच्या सिंचनातून निर्माण केलेल्या सामाजिक सौहार्दाला समाजात आणखीन घट्ट करण्यासाठी वचनबद्ध असू या ! असा सूर त्यांच्या श्रद्धांजली सभेत मान्यवरांनी आज व्यक्त केला.हास्य सम्राटाला श्रद्धांजली व्यक्त करताना हास्य व्यंगाची फोडणी देण्यात आली.
’हास्य सम्राट ’, ’मिर्झा एक्सप्रेस ’ डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे 28 नोव्हेंबरला निधन झाले. रविवारी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी त्यांना अभिवादन करण्यासाठी अभियंता भवन, शेगाव नाका चौक, अमरावती येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्यासोबत आयुष्य वेचलेल्या सामान्यातील सामान्य नागरिक या श्रद्धांजली सभेला आवर्जून उपस्थित होते.शासकीय अधिकारी,शेतीत काम करणार्या शेतकर्यांपासून मंदिरांच्या ट्रस्टी पर्यंत आणि वारकरी संप्रदायाच्या अनुयायांपासून मुस्लिम समुदायातील मान्यवरांपर्यंत सर्वांनी आज त्यांना हास्यांजली अर्पण केली. आपल्या लेखणीतून सर्व धर्मावर सर्व जातीपंथावर व्यंगात्मक टिपणी करून समाज प्रबोधन करण्याची खुमासदार शैली डॉक्टर मिर्झा रफी अहमद बेग यांना प्राप्त होती.त्यांच्या सिद्धहस्त लेखनीतून,विनोदी शैलीतून मनोरंजन तर व्हायचे मात्र प्रबोधनही व्हायचे.डॉक्टर मिर्झा हे खरे माणुसकीचे डॉक्टर होते.धर्मनिरपेक्षतेच्या सूत्रांवर त्यांनी शब्दांचे मनोरे रचले.ते राष्ट्रभक्त होते आणि त्यांच्या काव्यातून समाजातील आंतरिक दुही दूर करण्यात मदत झाली.त्यामुळे त्यांच्या अनुयायांनी त्यांच्या चाहत्यांनी याच मार्गक्रमणावर साहित्याचा कित्ता गिरवावा, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. उपजिल्हाधिकारी शामकांत मस्के यांच्या मार्गदर्शनात डॉ. मिर्झा रफी अहमद बेग मित्र मंडळाने आजच्या या श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते.यावेळी विचार मंचावर नागपूर उच्च न्यायालयाचे जेष्ठ विधीज्ञ डवोकेट फिरदोस मिर्झा, चंद्रपूरचे कवी किशोर मुगल,कोल्हापूरचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके हे प्रतिनिधिक श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्थानापन्न झाले होते. डॉ.मिर्झा रफी यामध्ये यांचे कुटुंबीय त्यांचे निकटवर्तीय यांच्याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवर व त्यांचे बालमित्र या शब्दांजलीच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थित होते.यामध्ये प्रामुख्याने चला हवा येऊ द्या फेम कवी प्रवीण तिखे,इतिहास संशोधक अनिरुद्ध पाटील, मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा.हेमंत खडके, जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, गझलकार रुपेश कावलकर, ज्येष्ठ पत्रकार सनत अहाळे, संतोष अरसोड, रमीझ मिर्झा, हुमा खान, जी बी देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. अनेकांनी त्यांच्याच लोकप्रिय कविता ऐकवून व त्यावर भाष्य करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या.




