सात बारा करून घेऊ कोरा, नाहीतर सरकारचे वाजवू बारा

बच्चू कडूंचा नवीन नारा

-आंदोलनाच्या भूमिकवर ठाम
अमरावती / 30 जून: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी, शेतमजूर आणि दिव्यांगांच्या प्रश्नांवर गुरूकूंज मोझरी येथे आठ दिवस अन्नत्याग आंदोलन केले. सरकारने लेखी आश्वासन दिल्यानंतर कडू यांनी आंदोलन स्थगित केले. सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावर समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, पण अजूनही अनेक मागण्यांवर तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे बच्चू कडू हे आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वात शेतकरी, शेतमजूर, विधवा, दिव्यांग, बेरोजगार, मेंढपाळ, मच्छिमार आणि मागासवर्गीय घटकांच्या मूलभूत हक्कांसाठी येत्या 7 जुलैपासून 138 किलोमीटरची पदयात्रा सुरू केली जाणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षातर्फे सांगण्यात आले आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव असलेल्या अमरावती जिल्ह्यातील पापळ येथून पदयात्रेला प्रारंभ होणार असून दोनद, उंबर्डा बाजार, लोही, तरणोडी, मानकी, तळेगाव, दारव्हा, वळसा, लाखखिंड, तिवरी, चिरकूटा, तूपटाकळी, वसंतनगर, काळी दौलत, माळकिन्ही, गुंज, या गावांमधून ही पदयात्रा 14 जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण (साहेबराव करपे- पहिली शेतकरी आत्महत्या झालेले गाव) आंबोडा येथे पोहोचणार आहे. एकूण सात दिवसांत 138 किलोमीटरचे अंतर पदयात्रेच्या माध्यमातून पार केले जाणार आहे. ‘सात बारा करून घेऊ कोरा, नाहीतर सरकारचे वाजवू बारा’, असा नारा यावेळी देण्यात आला आहे.
तत्काळ कर्जमाफी करा, सक्तीची कर्जवसुली थांबवा, शेतकरी आत्महत्या रोखणारी धोरणे तत्काळ लागू करा, विधवा व दिव्यांगांसाठी रोजगार, सुरक्षा योजनांची अंमलबजावणी, मनरेगा अंतर्गत पेरणी ते कापणीपर्यंत कामांचा विस्तार आणि मजुरी वाढविणे, तरूणांसाठी शिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे, या मागण्यांसाठी ही पदयात्रा काढली जात आहे. ही यात्रा केवळ एका राजकीय व्यक्तीची नसून, ती शेतकरी आणि कष्टकरी जनतेच्या हक्कासाठीची लोकचळवळ आहे.
सक्तीची कर्जवसुली थांबवणे आणि तत्काळ कर्जमाफी लागू करणे या प्रमुख मागण्यावर ही यात्रा केंद्रित असणार आहे. दरम्यान प्रत्येक ठिकाणी सभा, संवाद आणि स्थानिक अडचणी समजून घेण्यासाठी थांबे घेतले जातील, असे बच्चू कडू यांनी सांगितले आहे. आम्ही सरकारकडे शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांच्या प्रश्नांवर मागण्या केल्या आहेत. त्या एकट्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या मागण्या नाहीत. त्या सर्वसामान्यांच्या आहेत. त्या सरकारने पूर्ण केल्या पाहिजेत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे.

संबंधित बातम्या

Back to top button