देवुतवाडा गावात बिबटची दहशत : बकर्या भक्षस्थानी
वनविभागाकडून गावात पिंजरा आणि सीसीटीव्ही कॅमेरा

वरुड । 19 सप्टेंबर – गेल्या आठ दिवसांपूर्वी तालुक्यातील देऊतवाडा येथे दोन बोकडांचा बिबट्याने फडशा पाडल्यानंतर काल पुन्हा बिबट्याने एका बकरीची शिकार केल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी कॅमेरा आणि पिंजरा बसविला आहे. देऊतवाडा येथील सचिन थोटे यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यातील 40 हजार रुपये किमतीचे दोन बोकड बिबट्याने आठ दिवसांपूर्वी ठार केले होते. त्यानंतर वनविभागाने पंचनामा करून बिबट्याचा मागोवा घेण्यासाठी त्या ठिकाणी कॅमेरे लावले, मात्र त्यावेळी पिंजरा लावण्याची परवानगी न मिळाल्याने पिंजरा लावता आला नाही, त्यामुळे बिबट्याला जेरबंद करता आले नाही. गेल्या बुधवारी पुन्हा त्याच गावातील भूषण बांबल यांच्या गावालगत असलेल्या गोठ्यातून बिबट्याने 20 हजार रुपये किमतीच्या एका बकरीची शिकार केली. या घटनेतून बिबट्या त्या शिवारात फिरत असल्याचे स्पष्ट झाले. लागोपाठ घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे पशुपालक आणि शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करणे आवश्यक ठरले असून वनविभागाने गावात पिंजरा बसवून त्यात भक्ष ठेवून पाळत ठेवली आहे. रात्रीच्या सुमारास बिबट्या त्या पिंजऱ्याजवळ येऊन भोवती फेरी मारून निघून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. बिबट्या अद्याप जेरबंद न झाल्याने देऊतवाडा परिसरात भितीचे वातावरण कायम असून वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सतत लक्ष ठेवून आहेत. परिणामी झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी सचिन थोटे आणि भूषण बांबल यांनी केली आहे.




