सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा वकील संघाकडून निषेध

शिष्टमंडळाच्या नेतृत्वात जिल्हाधिकार्‍यांना दिले निवेदन

* अ‍ॅड. राकेश किशोर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

अमरावती /7 ऑक्टोबर : सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा देशभरात आणि जिल्हास्तरावर निषेध व्यक्त केला जात आहे. अमरावती जिल्हा वकील संघातर्फे मंगळवारी या घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शेकडो वकिलांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आणि वकील संघाच्या भावना शासनापर्यंत पोहचविण्याची विनंती केली.

अमरावती जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष डॉ. सुनील देशमुख, सचिव डॉ. अमोल मुरळ आणि डॉ. प्रशांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली वकील संघाच्या पदाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी सांगितले की, सोमवारी दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात घडलेली ही घटना अत्यंत घृणास्पद आणि दुर्भाग्यपूर्ण आहे. न्यायालयात कामकाजाच्या दरम्यान अ‍ॅड. राकेश किशोर यांनी सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न केला, जो भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही देशासाठी खूपच गंभीर प्रकार आहे. घटनेनंतर अ‍ॅड. राकेश किशोर यांनी धर्माचा उल्लेख केल्याने ही मानसिकता अधिक गंभीर ठरते, आणि त्यावर योग्य कायदेशीर कारवाई होणे आवश्यक आहे, तसेच अशा मानसिकतेला समाजातून दूर करणे काळाची गरज आहे.

अमरावती जिल्हा वकील संघाने या भ्याड घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत सर्वानुमते ठराव पारित केला. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा खासदार बळवंत वानखडे, आमदार सुलभा खोडके, संजय खोडके, रवी राणा, माजी मंत्री यशोमती ठाकूर आणि जिल्ह्यातील अनेक नेत्यांनीही निषेध व्यक्त केला असून, हा संविधानाचा अपमान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

संबंधित बातम्या

Back to top button