फक्त चर्चेचं गुर्‍हाळ! महायुतीच नाहीचं बिर्‍हाड!!

अमरावती/25 डिसेंबर- अमरावती महानगर पालिका निवडणूकीसाठी राज्यातील महायुती घटक पक्षांची मॅराथॉन बैठकांचा सीलसीला सुरु आहे असं कार्यकर्त्यांसाठी चित्र निर्माण केल्या जात आहे. वास्तविक या सर्व बैठक नाट्यामागे भाजप मित्र पक्षांना झुलवित असल्याची भावना आता जोर पकडत आहे. राज्यात भाजप व शिवसेना (एकनाथराव शिंदे गट) यांच मनोमिलन झालें आहे असं वरकरवी दाखवण्याचा जोरदार प्रयत्न सुरु असला तरी मोठा भाऊ असलेला भाजपला विदर्भात शिंदेच्या शिवसेनेला ताकद द्यायची नाही.
अमरावती महानगरपालिका निवडणूकीत एकुण 87 वार्डातील अवघ्या 75 जागांवर भाजप प्रत्यक्ष लढू शकते. याच जागांवर शिवसेना व युवा स्वाभिमान पक्षाचेही दावेदारी आहे. महानगरातील मुस्लिम बहुल भागातील 12 जागांचा भाजप विचारही करु शकत नाही. 75 जागांच्या गणितामध्ये भाजप मित्र पक्षांसाठी किती जागा सोडू शकतो यासाठी खल सुरु आहे अस सांगितल्या जाते प्रत्यक्षात अमरावती महानगरपालिकेतल्या राजकारणाचा मुंबई व इतर महानगरपालिकेच्या राजकारणावर थेट परिणाम होणार आहे. स्थानिक भाजप पदाधिकार्‍यांना असे वाटते की, शिवसेना किंवा युवा स्वाभिमान पक्षाचा भाजपला काहीही फायदा होणार नाही. मात्र अमरावतीत युती केली नाही तर त्याचा थेट परिणाम मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक या महत्वपूर्ण महापालिकांच्या राजकारणावर होवू शकतो. मुंबईसह 6 महानगरपालिकेत भाजप शिवसेना युती होणे अटळ आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे व मनसे एकत्र आल्यामुळे मंत्री आशिष शेलार यांची इच्छा नसतांनाही भाजप शिवसेना एकत्र येत आहे. महायुतीतील घटक पक्षांना सोबत घेतल्यावर सत्ता स्थापना व महत्वाच्या समित्यांवर भाजपचाच अंकुश राहील हा अंदाज घेत शिवसेना व इतर पक्षांशी बातचीत सुरु आहे. एका सुत्राने दिलेल्या माहितीनुसार काल नागपूर येथे झालेल्या भाजप व शिवसेना पक्ष नेत्यांच्या बैठकीत असा दावा करण्यात आला की, गेल्या अमरावती विधानसभा निवडणूकीत अपक्ष जगदीश गुप्ता यांना 34067 एवढी मते मिळाली. हे मतदान शिवसेनेचे असल्याचा दावा करण्यात आला. त्यावर भाजपच्या नेत्यांनी जगदीश गुप्ता आता शिंदे सेनेत गेलेले आहेत तर तेव्हाच्या मतदानाचा संबंध काय? असा प्रतिप्रश्न केला. जगदीश गुप्ता यांच्या वैयक्तीक लोकप्रियतेतून मते मिळाली अशीही पुष्ठी करण्यात आली तेव्हा मात्र भाजपाने स्पष्ट दावा केला की, परंपरागत भाजप मतदारांना राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर मतदान करायचे नव्हते त्यामूळे त्यांनी जगदीश गुप्ता यांना हिंदुत्ववादी उमेदवार समजुन मतदान केले. यावर मात्र वादविवाद झाला. जगदीश गुप्तांचा दावा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न सुरु असतांना शिवसेनेच्या एका नेत्याने हा वादाचा मुद्दा आहे त्यामूळे या मुद्यावर अधिक चर्चा करु नये अशी भुमिका घेतली. जगदीश गुप्ता यांचे शिवसेनेतील स्थान वाटाघाटीच्या टेबलवर अधिक प्रबळ होवु शकते असं लक्षात आल्याबरोबर शिवसेनेच्या जेष्ठ नेत्यांनी तत्काळ हा दावा मागे घेतला.
भाजप स्वतः 55 जागांवर लढेल, शिवसेनेला 12 व स्वाभिमानी पक्षाला 8 जागा देण्यास तयार असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात भाजपाला 75 जागा लढायच्या आहेत. एका नेत्याने असा दावा केला आहे की, अमरावतीत युती झाली नाही तर शिवसेना भाजपाविरुध्द लढली तरीही काहीही पडणार नाही. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाहीर होताच क्षणी त्यांच्या विरुध्द उबाठा उभी राहील व शिवसेना विरुध्द शिवसेना अशी लढाई सुरु होईल. प्रसंगी उबाठाला भाजप आतुन ताकद देण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्वाभिमानी पक्षाबाबत भाजपाचे धोरण अद्याप अस्पष्ट असुन आ. रवि राणा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट घेतली आहे. आ.रवि राणा यांना महायुतीत युवा स्वाभिमान पक्ष असावा यासाठी फिल्डींग लावावी लागत आहे. उबाठाचे जिल्हा प्रमुख प्रशांत वानखडे व राष्ट्रवादीच्या सपना ठाकुर यांना आपल्या तंबुत घेवून ’विनर कॅन्डीडेट’ अशी घोषणा करुन टाकली आहे. प्रशांत वानखडे व सपना ठाकुर या दोन उमेदवारापलिकडे सध्या राणांकडे अन्य हमखास विजयी उमेदवार नाहीत. भाजपाने राणांना वेटींगवर ठेवले आहे. आ. रवि राणांनीही आपल्या व्युहरचनेत बदल केला असून शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजितदादा गट या पक्षातील नाराजांना ते स्वाभिमानकडे वळवित आहेत. आ. संजय खोडके यांनी राष्ट्रवादी सर्वच जागा लढवेल अशी घोषणा केल्यामुळे प्रसंगी शिवसेनेला रोखण्यासाठी राष्ट्रवादीचीही भाजप मदत घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमरावती महानगरपालिकेत भाजपला शिवसेना शिंदे गट नको आहे, शिवसेना शिंदे गटाला युवा स्वाभिमान पक्ष नको आहे आणि आ. संजय खोडके यांना रवि राणांचच राजकारण नको आहे त्यामुळे भाजप तिन्ही पक्षातल्या अंतर्गत कलहामुळे आपला फायदा कसा होईल याकडे बगळ्यासारखी नजर लावून बसला आहे. चर्चेच गुर्‍हाळ चालू ठेवून प्रत्येक वार्डातुन होणार्‍या संभाव्य लढतीचा भाजप अंदाज घेत आहे. राज्यातील राजकारणाची भुमिका पाहता भाजप शिवसेना युती वरवर दिसली तरी प्रत्यक्षात वार्डामध्ये विलक्षण वेगवेगळ्या लढती दिसू शकतात. भाजपला शिवसेना नको असं जाहीरपणे सांगता आल नाही तरी रवि राणाच्या माध्यमातून विधानसभेतील दर्यापूर मतदार संघ काही वार्डात दिसू शकतो तर रवि राणांनी दिलेल्या उमेदवाराला चित करण्यासाठी आ.संजय खोडके आणि माजी खासदार आनंदराव अडसुळ एकत्र येवु शकतात. वास्तविकरित्या महायुतीतील तीनही पक्ष एकमेकांविरुध्द लढतांना दिसतील ज्यामध्ये युवा स्वाभिमान विरुध्द शिवसेना व राष्ट्रवादी, शिवसेना विरुध्द युवा स्वाभिमान व राष्ट्रवादीविरुध्द युवा स्वाभिमान अशी एकमेकांचे उमेदवार पाडणारी ही निवडणूक असणार आहे. युतीचा संसार फाटका दिसणार नाही मात्र पदोपदी ठिगळं दिसतील असं एकुण राजकीय चित्र 30 तारखेनंतर समोर येवु शकते.

संबंधित बातम्या

Back to top button