गणेश विसर्जन मिरवणुकीत चाकू हल्ला; युवक गंभीर
आरोपींच्या अटकेसाठी नागरिकांचा ठिय्या

-हमालपुरा परिसरात तणाव
अमरावती / 10 सप्टेंबर : शहरातील हमालपुरा येथील करण बारसमोर काल रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान दोन मंडळांच्या युवकांमध्ये झालेल्या भांडणाचे रूपांतर थेट रक्तपातात झाले. वीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी असलेला संकेत संदीप जगताप (रा. हमालपुरा) याच्यावर बालवीर मंडळाशी संबंधित असलेल्या सोनू आगाशे, प्रफुल उर्फ पप्पू कुबडे व सूरज मोटे या तिघांनी चाकूने सपासप वार केले. या घटनेत संकेत जगताप गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी आरोपींविरुद्ध हत्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
काल रात्री सुमारे 10 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. वीर तानाजी मंडळाची विसर्जन मिरवणूक करण बारपासून सुरू झाली असता संकेत जगताप आपला मित्र कृणाल नलवाडेसह गुलाल उधळत नृत्य करीत होता. त्याच वेळी सोनू आगाशे, पप्पू कुबडे व सूरज मोटे यांनी येऊन संकेत व कृणाल यांच्याशी वाद घातला. तिघांनी संकेतला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. त्याला वाचविण्यास कृणाल पुढे सरसावला असता त्यालाही धमकावण्यात आले. तत्क्षणी सोनू आगाशेने चाकू काढून संकेतच्या पोटावर, कमरेवर व छातीवर वार केले. या प्रकारानंतर महिलांसह मंडळातील सदस्यांमध्ये आरडाओरड सुरू झाली आणि आरोपी तिघेही पळून गेले.
घटनेनंतर जखमी संकेतला नागरिकांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर राजापेठ पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सोनू आगाशे, प्रफुल कुबडे व सूरज मोटे या आरोपींचा शोध सुरू केला आहे.
दरम्यान, आज सकाळी हमालपुरा परिसरातील नागरिक व जगताप कुटुंबीयांनी आरोपींना त्वरित अटक करण्याच्या मागणीसाठी करण बारसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. अचानक रस्त्यावर बसलेल्या नागरिकांमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरसीपी व क्यूआरटी पथक घटनास्थळी धाडले. पोलिस अधिकार्यांनी आंदोलकांना समजावून सांगत लवकरच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.




