अमरावतीत कारंज्याच्या अल्पवयीन युवकाचे अपहरण!

राजापेठ ठाण्यात गर्दी व तणावाचा प्रसंग

-मॉलमध्ये युवतीसोबत फिरताना गायब
अमरावती / 1 सप्टेंबर : शहरातील बडनेरा रोडवरील प्रसिद्ध मॉलमध्ये शनिवारी दुपारी कारंजा येथील एका 16 वर्षीय अल्पसंख्यांक समाजातील अल्पवयीन युवकाचे नाट्यमयरीत्या अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर राजापेठ पोलिस ठाण्यात मोठी गर्दी जमली. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा किशोर मॉलमध्ये एका युवतीसोबत फिरत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी पाहिल्याचे सांगितले जात आहे. त्याचवेळी काही अज्ञात लोक मॉलमध्ये घुसले आणि त्याला जबरदस्ती वाहनात बसवून पळवून नेले. पळवून नेण्यात आलेले वाहन मारुती इर्टीगा कार असल्याची माहिती मुलाने स्वतःच्या वडिलांना फोनवरून कळवली.
ही माहिती मिळताच संतप्त नातेवाईक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने राजापेठ पोलीस ठाण्यात जमा झाले. दोन समाजातील वादाचा संदर्भ असल्याने वातावरण ढवळून निघाले. दरम्यान, चौकशीत हा अल्पवयीन युवतीला फूस लावून फिरत असल्याची बाबही समोर आली आहे. त्यामुळे त्याच्या ‘कृत्या’वरूनच काही संघटनांनी स्वतःहून कारवाईचा मार्ग अवलंबल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.
फिर्यादीनुसार, अज्ञात लोकांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविण्यात आला असून, पोलिसांनी अल्पावधीतच अल्पवयीन युवकाचा शोध लावला. मात्र त्याला पळवून नेणार्‍यांची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही. या प्रकरणी उपनिरीक्षक इकबाल खान अधिक तपास करीत असून, अज्ञात अपहरणकर्त्यांचा शोध घेतला जात आहे. पोलिस प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवून तणाव वाढू नये यासाठी खबरदारी घेतली.

संबंधित बातम्या

Back to top button