आरएसएसच्या शताब्दी समारंभात उपस्थितीला कमलताईंचा नकार

स्वलिखित पत्र जारी करुन दिले स्पष्टीकरण

-निर्णयाने सामाजिक-वैचारिक चर्चा गतीला
अमरावती / 28 सप्टेंबर : आगामी 5 ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी विजयादशमी समारंभाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना नुकतीच नवीन दिशा मिळाली आहे. संघाच्या अमरावती महानगर शाखेने या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून कमलताई गवई यांना आमंत्रित केले होते, मात्र त्यांनी स्पष्ट केले आहे की, त्या या समारंभात सहभागी होणार नाहीत. कमलताई गवई यांनी आपल्या निर्णयाचे कारण पत्रकाद्वारे सांगितले आणि स्पष्ट केले की, मी कोणतेही आमंत्रण स्वीकारलेले नाही, ना कोणतीही लिखित सहमती दिलेली आहे, त्यामुळे या कार्यक्रमात मी सहभागी होणार नाही. त्यांच्या या निर्णयामुळे सामाजिक तसेच वैचारिक स्तरांवर चर्चेला गती मिळाली आहे.
कमलताई गवई या एका मातब्बर कुटुंबातील प्रमुख असण्यासोबतच सामाजिक व राजकिय क्षेत्रातील अत्यंत मान्यवर व्यक्तींपैकी एक आहेत. त्या देशाचे प्रधान न्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री असून, दिवंगत राज्यपाल रा. सू. गवई यांच्या पत्नी आहेत. या पार्श्वभूमीमुळेच त्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या त्यांच्यासाठी वैचारिक भिन्नत्व असलेल्या संस्थेच्या कार्यक्रमातील सहभागाबाबत चर्चेला उधान आले होते. गेल्या काही दिवसांपासून माध्यमांत आणि सामाजिक पातळीवर या निर्णयावर विविध मतांची देवाणघेवाण सुरू होती.
काही सामाजिक विचारवंतांच्या मते, सर न्यायाधीशांच्या मातोश्रींचा असा निर्णय सामाजिक समावेश आणि विचारसरणीवर कसा परिणाम करतो, हे महत्त्वाचे आहे. तर काहींनी असा प्रश्न उपस्थित केला की, वैचारिक दृष्टिकोनातून सामाजिक संवाद कसा साधावा, याबाबत सार्वजनिक चर्चेला चालना मिळू शकते. आपली मातृभूमिने यासंदर्भात संघाचे मत जाणून घेण्यासाठी महानगर संघचालक उल्लास बोपोरिकर यांच्याशी संपर्क साधला, परंतु त्यांनी या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आणि सांगितले की, सध्याचे लक्ष कार्यक्रमाच्या तयारीवर आहे. या संदर्भात सध्या काही सांगणे योग्य नाही. संघाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.
कमलताई गवईंचा निर्णय हा केवळ एका व्यक्तीच्या कार्यक्रमातील सहभागाचा विषय नव्हे तर तो सामाजिक आणि वैचारिक दृष्टिकोनातून चर्चेला नवा रंग देणारा ठरला. अनेक विश्लेषकांचे मत आहे की, या निर्णयामुळे सामाजिक स्तरांवर चाललेली चर्चा अधिक गहन होईल, लोकांच्या मनातील प्रश्नांना योग्य दिशा मिळेल आणि कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वैचारिक चर्चा चालू राहील. स्थानिक आणि प्रादेशिक माध्यमांमध्ये या निर्णयाबाबत विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही सामाजिक संघटनांनी त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले, तर काही लोकांनी विचारमंथन सुरू केले. या पार्श्वभूमीवर, संघाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू असताना सामाजिक संवादाचे महत्त्व अधिक स्पष्ट होत आहे.
कमलताई गवईंचा आरएसएसच्या शताब्दी विजयादशमी समारंभात सहभाग नाकारण्याचा निर्णय फक्त वैयक्तिक निवड नसून, तो सामाजिक संवाद आणि वैचारिक चर्चेला नवे वळण देणारा ठरतो. या निर्णयामुळे भविष्यात सार्वजनिक चर्चा, सामाजिक समावेश आणि विचारसरणीवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे.

संबंधित बातम्या

Back to top button