शिवमती मयुराताईंच्या नेतृत्वात जिजाऊंच्या लेकींची जागतिक भरारी

व्हिएतनामच्या हा लाँग शहरात घुमणार शिवगर्जना

* आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडचे तिसरे जागतिक महाअधिवेशन

अमरावती /25 फेब्रुवारी : महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले स्त्री शक्तीचे विचार आता मयुराताई देशमुख यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सातासमुद्रापार पोहचले आहेत. आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा शिवमती प्राध्यापक मयुराताई देशमुख यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली येत्या 28 फेब्रुवारी 2026 रोजी व्हिएतनाममधील ’हा लाँग’ येथे तिसरे जागतिक महाअधिवेशन आणि शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. मराठा सेवा संघाचे संस्थापक एडव्होकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या प्रेरणेने सुरू झालेला हा प्रवास आज जागतिक स्तरावर सुवर्ण अक्षरांनी लिहिला जात आहे. केवळ चूल आणि मूल यात न अडकता, महिलांनी शिक्षण, अर्थ, राजकारण आणि समाजकारण या पाचही क्षेत्रांत आपला दरारा निर्माण केला असून, व्हिएतनामचा हा सोहळा भारतीय संस्कृतीच्या अस्मितेचा नवा अध्याय ठरणार आहे.
1992 मध्ये अमरावतीमध्ये रोवलेले हे रोपटे आज मयुराताईंच्या दूरदृष्टीमुळे वटवृक्ष झाले आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन शिवश्री डॉक्टर संजय वायाळ (संस्थापक, ईश्वेद ग्रुप) यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षपद स्वतः शिवमती प्राध्यापक मयुराताई देशमुख भूषवणार आहेत. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिवश्री योगाचार्य अक्षय दारोकर उपस्थित राहणार आहेत. परदेशात राहूनही आपल्या संस्कृतीची मूल्ये जपत, पुढच्या पिढीला जिजाऊंच्या विचारांशी जोडण्याचे मोठे कार्य या माध्यमातून मयुराताई करत आहेत. त्यांच्या या कार्याचे कौतुक आज सर्व स्तरातून होत आहे. या जागतिक सोहळ्यासाठी आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडच्या अनेक रणरागिणींनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष शिवमती गायत्री दारोकर, कार्याध्यक्ष शिवमती सुजाता ठुबे, सरचिटणीस शिवमती वनीता अरबट, कोषाध्यक्ष शिवमती डॉक्टर शारदा जाधव, सहकोषाध्यक्ष शिवमती वैशाली वायाळ, उपाध्यक्ष शिवमती अनुजाराजे भोसले, उपाध्यक्ष शिवमती वंदनाताई घोगरे, प्रसिद्धी प्रमुख शिवमती संयुक्ता देशमुख, अमेरिकेच्या उपाध्यक्ष शिवमती अनुराधाताई आढाव आणि समन्वयक शिवमती स्नेहाताई खेडेकर या सर्व महिलांच्या योगदानाने हा सोहळा यशस्वी होत आहे. मयुराताईंच्या मार्गदर्शनाखाली या सर्व महिला शक्तीचा स्तंभ बनून समाजाची नवी ओळख निर्माण करत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button