प्राणघातक हल्ल्यातील जेरबंद आरोपी पसार

परतवाडा पोलिसांना दिला चकमा

पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
अमरावती / 18 जुलै : अचलपूर तालुक्यातील म्हसोना येथे लहान भावावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देवून पसार झाल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्याला पून्हा अटक करण्यासाठी परतवाडा पोलिसांनी प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नव्हता.
नामदेव बळीराम दहीकर (38) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला परतवाडा पोलिसांचे एक पथक आज दुपारी अडिच वाजताच्या सुमारास पंचनाम्यासाठी घटनास्थळी नेत असताना ही घटना घडली. दोन दिवसांपूर्वी नामदेव दहीकरने आपला लहान भाउ विलास बळीराम दहीकर याच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली होती. विलासने पैसे देण्यास नकार दिल्याने नामदेवने त्याच्यासोबत भांडण केले आणि घरीच लोखंडी रॉडने विलासच्या डोक्यावर प्रहार केला होता. या घटनेत विलास दहीकर याला जबर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.
याप्रकरणी नामदेव आणि विलासचे वडिल बळीराम दहीकर यांनी याबाबत परतवाडा पोलिसांत तक्रर दाखल केली होती. त्यावरुन पोलिसांनी नामदेव दहीकरला अटक केली आणि लहान भावावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आज दुपारी परतवाडा पोलिसांचे एक पथक नामदेवला पंचनाम्यासाठी घटनास्थळी घेउन जात होते. दरम्यान पोलिस बेसावध असताना त्यांची नजर चूकवून नामदेव दहीकर पसार झाला.
या घटनेमुळे परतवाडा पोलिस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. वरिष्ठांनाही याबाबत माहिती देण्यात आली आहे. नामदेवला पून्हा अटक करण्यासाठी परतवाडा पोलिसांनी प्रयत्न सुरु केलेत. मात्र रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. पोलिसांच्या तावडीतून एका गंभीर घटनेतील आरोपी पसार झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संबंधित पोलिस कर्मचार्‍यांवर याप्रकरणात वरिष्ठांकडून कारवाई केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

संबंधित बातम्या

Back to top button