जगदीश गुप्त यांचा 7 जुलैला शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
प्रदिर्घ चर्चेला मिळणार विराम

-शंभरावर समर्थकही शिवसेनेत जाणार
अमरावती / 3 जुलै: अमरावतीचे माजी पालकमंत्री जगदिश गुप्ता विभानसभा निवडणुकीतील बंडखोरीमुळे भाजपमधून निष्कासित झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. त्यासंदर्भाने अमरावतीच्या राजकिय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना आता विराम मिळणार आहे. जगदिश गुप्ता हे 7 जुलै रोजी शिंदेंच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले असून स्वत: गुप्ता यांनीच ही माहिती दिली आहे. आपल्यासोबत 70 ते 100 समर्थकही शिंदेसेनेत जाणार असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले आहे. शिंदे यांनी मान्य केल्यानंतरच आपला शिवसेना प्रवेशाचा मूहूर्त ठरल्याचे गुप्ता म्हणाले.
गेल्या 30 वर्षांपासून भाजपमध्ये असलेले गुप्ता जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते आहेत. 1995 मध्ये भाजप-शिवसेना युतीत अमरावतीतून आमदार असताना त्यांनी राज्यमंत्रीपद व अमरावतीचे पालकमंत्रीपद भूषविले होते. गत विधानसभा निवडणुकीत मात्र हिंदुत्वाच्या मुद्यावर त्यांनी भाजपविरोधात बंड पूकारले. अमरावतीची जागा महायुतीत अजित पवार गटाला गेल्यानंतर महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढविली. तेव्हा भाजपच्या नेतृत्वाने गुप्ता यांना निष्कासित केले व पक्षातून त्यांना बाहेरचा रस्ता दाखविला. मोदी भक्त समजले जाणारे जगदिश गुप्ता यांना पून्हा पक्षात घेतले जाण्याची कुठलीही चिन्हे दिसत नव्हती. त्यामुळे ते आता शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. त्यासाठी जगदिश गुप्त यांनीही तयारी चालविली असल्याचे दिसून येत होते.
शिंदे सेनेने हिंदुत्वाच्या मुद्यावरच बंड केले होते. जगदिश गुप्तांनीही याच मुद्यावर विधानसभा निवडणूक लढविली होती. त्यामुळे याच विचारधारेमुळे शिंदेंसोबत जाणे सोयीचे असल्याने जगदिश गुप्ता यांनी शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय घेतला. गेल्या तीन महिन्यांपासून गुप्ता एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. याबाबत त्यांनी आपल्या निकटवर्तीय व समर्थकांसोबत चर्चा केली होती. जगदिश गुप्ता यांनी शिंदे सेनेत प्रवेश करावा याकरिता 620 समर्थकांनी त्यांना लेखी स्वरुपात पत्राद्वारे संमती दिली होती. याची माहिती त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही दिली होती. अशात आता 7 जुलै रोजी जगदिश गुप्ता हे शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत प्रवेश करणार आहेत. ही घडामोड आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महत्वपूर्ण समजली जात असून राजकिय वर्तुळाचे याकडे लक्ष लागले आहे.




