7 किलो गांजासह इसमाला अटक
गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती / 17 ऑगस्ट : गुन्हे शाखेच्या पथकाने रहाटगाव ते लालखडी जाणार्या रिंग रोडवरील चौकात कारवाई करून उस्मान शहा युसुफ शहा (वय 46, व्यवसाय चालक, रा. इरफान नगर, लालखडी, अमरावती) याला सुमारे सात किलो गांजासह अटक केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचला. आरोपी आपल्या पाठीवरील सॅकमध्ये गांजा ठेवून विक्रीसाठी जात असताना तो पथकाच्या हाती लागला. तपासादरम्यान त्याच्याकडून सुमारे 7 किलो गांजा जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपीने हा गांजा स्थानिक पातळीवर विक्री करण्यासाठी आणल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांच्या मते इतक्या मोठ्या प्रमाणात गांजा मिळाल्यामुळे या प्रकरणामागे इतर व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पुढील तपासातून या बाबत अधिक माहिती समोर येणार आहे. या कारवाईनंतर आरोपीवर एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास गुन्हे शाखा करीत आहे. अवैध धंद्याविरुद्ध कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




