सट्टा बाजारात कमालीची अनिश्चितता ?
बहुकोनीय लढतींच्या पेचामुळे धुरंधरांची झोप उडाली

* महापालिकेच्या निवडणुकीवर दिग्गज नेते संभ्रमात
* कट्याकट्यांवर उमेदवारांच्या निकालावर चर्चांना उधान
अमरावती /13 जानेवारी – शहर आणि जिल्ह्यात सध्या राजकीय संघर्षाने टोक गाठले असून, महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने विजयाचे समीकरण अधिकच क्लिष्ट झाले आहे. अनेक राजकीय पक्षांनी मोठ्या संख्येने आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्याने सामान्य मतदारांमध्ये कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राजकीय गणिते इतकी बिघडली आहेत की, ठामपणे विजयाचा दावा करणे कोणालाही शक्य होईनासे झाले आहे. कालपर्यंत हातात हात घालून फिरणारे मित्रपक्ष आता एकमेकांपासून दूर गेल्याने मतदारांचा कौल नेमका कुणाकडे वळणार, याचा अंदाज वर्तवणे कठीण झाले आहे.
या रणधुमाळीत काँग्रेसचे विलास इंगोले व बबलू शेखावत, भारतीय जनता पक्षाचे तुषार भारतीय, चेतन पवार, सुनील काळे व चेतन गावंडे, शिवसेनेचे राजेंद्र तायडे व राजेंद्र महल्ले, युवा स्वाभिमानचे प्रशांत वानखडे तसेच राष्ट्रवादीचे जफर, प्रशांत डवरे आणि अविनाश मार्डिकर यांसारख्या अनेक मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. चुरशीच्या या लढतीत स्वतः उमेदवारही पूर्णपणे साशंक असून, ते सातत्याने जनमताचा कौल अजमावण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, अमरावती शहराचे पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी पदभार स्वीकारल्यापासून शहरातील अवैध धंद्यांवर आपला वचक निर्माण केला आहे. त्यांच्या कार्यकाळात गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर झालेल्या धडक कारवायांमुळे एरवी निवडणुकीच्या काळात गरम असणारा सट्टा बाजार यावेळी पूर्णपणे थंड पडला आहे. पोलीस आयुक्तांच्या धाकामुळे सट्टा बाजार बंद आहे की उमेदवारांच्या अनिश्चित भविष्यामुळे सट्टेबाज सावध आहेत, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सट्टा बाजारात अद्याप कोणाचेही दर निश्चित झाले नसल्याने ही शांतता कोणाला फळणार आणि विजयाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
खाकीचा वचक आणि सट्टा बाजारात चुप्पी-पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी अवैध धंद्यांचे कंबरडे मोडल्याने शहरातील सट्टेबाज सध्या भूमिगत झाले आहेत. निवडणुकीत नेहमी सक्रिय राहणारा सट्टा बाजार यंदा पोलिसांच्या भीतीने शांत आहे. उमेदवारांची मोठी फौज मैदानात असल्याने कोणाचे पारडे जड आहे, हे स्पष्ट नसल्यामुळे सट्टा बाजाराने अद्याप चुप्पी साधली आहे. अखेरच्या दिवशी बाजारात काही हालचाली होतात की ही शांतता कायम राहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




