‘सरकार महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं…’
यशोमती ठाकूरांचा मुख्यमंत्र्यांवर प्रहार

अमरावती / 9 जुलै: मीरा-भाईंदरमध्ये मराठीच्या मुद्यावर राजकारण तापलेले असताना काँग्रेसच्या माजी आमदार यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे. ‘ज्या प्रकारची जुलूमशाही या महायुती सरकारने मराठी माणसांवर चालवलीय त्यावरून प्रश्न पडतो हे सरकार महाराष्ट्राचं आहे की गुजरातचं?’, असा प्रश्न ठाकूर यांनी केलाय.
‘एकीकडे मराठीद्वेषी मीरा भाईंदर येथे बेकायदा मोर्चा काढतात. मराठी माणसांविषयी वाट्टेल ती गरळ ओकतात. त्यांच्यावर साधी कारवाई फडणवीसांचं गृहखातं करत नाही. उलट मराठी माणसं शांततेत मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागत असताना त्यांच्यावर जोरजबरदस्ती केली जाते. त्यांची बेकायदा पद्धतीने धरपकड केली जाते. हा कोणता न्याय आहे?’ असे देखील ठाकूर यांनी म्हटले आहे.
फडणवीस, मराठी माणसाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका, असा इशारा ठाकूर यांनी दिला आहे. तसेच जे जे महाराष्ट्राच्या अस्मितेचे आहे, ते ते सर्व संपवण्याचा डाव या भाजप आणि आरएसएसच्या लोकांचा आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा, महाराष्ट्रातील उद्योग पळवण्याचा घाट याचसाठी घातला जातोय कारण यांना महाराष्ट्र अस्थिर करायचा आहे, महाराष्ट्र गुलाम करायचा आहे, अशी टीका ठाकूर यांनी फडणवीस यांच्यावर केली होती. शालेय शिक्षणात पहिलीपासून हिंदी भाषा असू नये, ही महाराष्ट्रातील तमाम जनतेची मागणी आहे. त्यामुळे बाल मनावर हिंदी लादून मातृभाषेला, माय भूमीला पोरकं करण्याचा सरकारचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. फडणवीसांनी जरी हिंदी भाषेचा जीआर रद्द केला असला तरी, मागच्या दाराने ते हिंदी लादू पाहत आहेत. त्यामुळे नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ती बर्खास्त करावी, फडणवीसांनी मराठीबद्दल पुतना मावशीचं प्रेम दाखवू नये, अशी घणाघाती टीका काँग्रेसनेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.




