रामा येथील रेल्वे गेट बांधकामात सावळा गोंधळ
एक वर्षापासून रस्ता बंद असल्याने शेतकरी त्रस्त

* जिल्हाधिकारी कार्यालय व साबांमध्ये समन्वयाचा अभाव
अमरावती / 22 जानेवारी – जिल्ह्यातील भातकुली तालुक्या अंतर्गत रामा येथील रस्ता 280 मध्ये रेल्वेगेट च्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन दिलेले आदेश व आवश्यक परवानग्या नसल्याचे कारण देत रेल्वे विभागाने कामास नकार दिला आहे. परंतु या सर्व गोंधळात सदर रस्त्याचे काम गेल्या एक वर्षा पासून बंद असल्यामुळे परिसरातील नागरिक व शेतकर्यांना रस्त्या अभावी प्रचंड मनस्ताप होत असल्यामुळे या बाबत तात्काळ तोडगा काढण्यात यावा व नमकी काय स्थिती आहे हे प्रशासनाने उघड करावे अशी मागणी आज 22 जानेवारी रोजी रामा गावातील नागरिकांनी पत्रकार परिषदेत केली.तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी या रस्याच्या रेल्वे गेट बांधकामाचे आदेश दिले होते. जिल्हाधिकार्यांनी परवानगी दिल्या नंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रेल्वे विभागाची पत्रव्यवहार केला मात्र आवश्यक परवानग्या नसल्याचे कारण देत रेल्वे विभागाने कामास नकार दिला. सार्वजनिक बांधकाम विभागाने जबाबदारी झटकली तर रेल्वे विभागाने यावर आक्षेप घेतल्यामुळे गेल्या वर्षभर्यापासुन रस्त्याचे काम रखडले असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत प्रशासनाने व रेल्वे विभागाने तत्काळ खुलासा करावा अशी मागणी परिसरातील संत्तप्त नागरिकांनी केली आहे.
प्रशासनाच्या विरोधात आवाहन उठविलातर दडपशाही
गेल्या एक वर्षापासुन रस्त्याचे काम बंद पडले आहे. नागरिकांना व शेतकर्यांना होणारा त्रास असह्य झाला आहे. या बाबत जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले मात्र याबाबत कोणताच खुलासा होत नाही. तर याविरोधात आवाज उठविला तर पोलिस गुन्हे दाखल करण्याचा दम देतात हा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचा आरोप पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या निलेश पानसे, विजय अटाळकर, स्वप्निल लोहकरे, कपील भोकरे, शिवाजी अब्रुक, मोहन अब्रुक, भुषन अब्रुक यांनी केला.




