पोलिस ठाण्यातच निरिक्षक व महिला कॉन्स्टेबलला धक्काबूक्की
शिवीगाळ करुन मोबाईल फेकून मारला

-महिला व पुरुषाचा वलगाव ठाण्यात गोंधळ
अमरावती / 13 जुलै: चोरीच्या घटनेत जप्त करण्यात आलेल्या कुर्हाडीवर हक्क सांगत ती मिळविण्यासाठी एक पुरुष आणि एका महिलेने वलगाव पोलिस ठाण्यात चांगलाच गोंधळ घातला. पोलिस निरिक्षक पानसरे यांना त्यांच्याच कक्षात शिवीगाळ करुन धक्काबूक्की करण्यात आली. एका महिला काँस्टेबलला लोटून देत त्यांच्या अंगावर मोबाईल भिरकाविण्यात आला. आणखी एका पोलिस कर्मचार्यालाही त्यांनी शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास वलगाव पोलिस ठाण्यात घडली. याप्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल धनिष्ठा शंकरराव शिरभाते यांच्या तक्रारीवरुन दोघांवरही आज रविवारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
जयश्री हरिच्छंद्र गंधे (45) आणि अरविंद सुधाकर चारथळ (35, रा. आष्टी, ता. भातकुली) अशी आरोपी महिला-पुरुषाची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार अरविंद चारथळ याला काही दिवसांपूर्वी चोरी प्रकरणात अटक करुन वलगाव ठाण्यातील कर्मचारी संजय काळे यांनी त्याच्याकडून चोरीची एक कुर्हाड जप्त केली होती. ही कुर्हाड मागण्यासाठी अरविंद आणि जयश्री गंधे शुक्रवारी सायंकाळी वलगाव ठाण्यात आले. संजय काळे यांच्याकडे आधी कुर्हाड देण्यासाठी तगादा लावून त्यांनी वाद घातला. नंतर पोलिस निरिक्षक पानसरे यांच्या कक्षात जावून हुज्जत घालायला सुरुवात केली.
आवाज ऐकुन कॉन्स्टेबल धनिष्ठा शिरभाते यासुद्धा कक्षात पोहोचल्या. निरिक्षक पानसरे यांनी त्यांना समजावून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला. ही कुर्हाड तुम्हाला कोर्टातून आदेश आणून मिळवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र दोघेही काहीही ऐकुण घेण्यास तयार नव्हते. यावेळी धनिष्ठा शिरभाते यांनी महिलेला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तिने त्यांना जोराने लोटून दिले व हातातला मोबाईल त्यांच्या अंगावर भिरकावला. तसेच अरविंद चारथळ हा निरिक्षक पानसरे यांच्या अंगावर धावून गेला. त्यांनी अधिकारी संजय काळे यांनाही शिवीगाळ केली. पाहुण घेण्याची धमकी देवून दोघेही पोलिस ठाण्यातून निघून गेले.
महिला व पुरुषाने घातलेल्या या गोंधळामुळे वलगाव पोलिस ठाण्यात चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान महिला पोलिस कॉन्स्टेबल धनिष्ठा शिरभाते यांनी याबाबत वलगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी आरोपी जयश्री गंधे आणि अरविंद चारथळ यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप तसेच पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा नोंदविला आहे.




