मनपा निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची पाहणी

पोलीस आयुक्त व मनपा आयुक्तांनी घेतला सखोल आढावा

अमरावती /6 जानेवारी : आगामी अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या पारदर्शक आणि सुरळीत आयोजनासाठी आज महत्त्वपूर्ण मतदान केंद्रांची पाहणी करण्यात आली. यावेळी अमरावती पोलीस आयुक्त राकेश ओला आणि निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मतदारांसाठी सुरक्षित आणि सुलभ मतदान सुविधा सुनिश्चित करण्यावर भर दिला.
सदर पाहणी जमील कॉलनी परिसरातील शाळा क्र. 8, ज्यामध्ये मतदान केंद्र क्रमांक 19 आहे, तसेच कॅडमी स्कूल, असोसिएशन स्कूल आणि विद्या निकेतन स्कूल येथे करण्यात आली. या मतदान केंद्रांची पाहणी करताना पोलीस आयुक्त व आयुक्तांनी सुरक्षेची, प्रशासनिक व्यवस्था, प्रवेशद्वारांची सुविधा, मतदारांच्या गर्दीचे नियोजन आणि मतदान प्रक्रिया पारदर्शकतेने पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा सखोल आढावा घेतला.
शहरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ मतदानाची सुविधा मिळावी यासाठी पोलीस आयुक्तांनी पोलिस दलाचे योग्य नियोजन केले असून, मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक पथके तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतदान केंद्रांवरील प्रशासकीय व्यवस्था, शाळा प्रशासनासह संबंधित कर्मचारी यांच्यासोबत बैठक घेऊन मतदान दिनी कोणत्याही प्रकारच्या अडचणी उद्भवू नयेत याची दक्षता घेतली.
पाहणीदरम्यान पोलीस आयुक्त आणि आयुक्त यांनी मतदारांसाठी स्वच्छता, प्राथमिक वैद्यकीय सुविधा, प्रेक्षणीय चिन्हे, प्रवेशाचे मार्गदर्शन याची व्यवस्था चाचणी केली. त्यांनी सांगितले की, महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांना सुरक्षित, जलद आणि सुलभ मतदानाची सुविधा मिळणे हे सर्वांचे कर्तव्य आहे.
अमरावती महानगर पालिकेच्या निवडणूक तयारीत प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मतदारांची यादी, मतदान सामग्री आणि सुरक्षेची पूर्ण तयारी केली आहे. आगामी निवडणूक 2025-26 पारदर्शक, सुरक्षीत आणि आदर्श पद्धतीने होण्यासाठी प्रशासन सक्रियपणे कार्यरत आहे. या पाहणी दरम्यान पोलीस आयुक्त राकेश ओला यांनी सूचना केल्या की, मतदान केंद्रांवर सुरक्षा पथके पर्याप्त प्रमाणात तैनात करावीत. मतदान केंद्र परिसरात मतदारांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी योग्य रस्ता आणि मार्गदर्शन व्यवस्था असावी. मतदान दिनी कोणत्याही प्रकारच्या अनुचित हालचाली टाळण्यासाठी संपूर्ण पोलिस दल सतर्क राहावे. आवश्यक असल्यास प्राथमिक वैद्यकीय सुविधा आणि आपत्कालीन मदत उपलब्ध ठेवावी. मतदान केंद्रांवर सर्व सुरक्षा साधने (उउढत, ध्वनी प्रणाली इ.) कार्यरत असावीत.
या पाहणी दरम्यान अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी सूचना केल्या की, मतदान केंद्रांवर स्वच्छता, प्रकाश, पाणी आणि शौचालय सुविधा पूर्ण असाव्यात. प्रत्येक मतदान केंद्रावर प्रवेशद्वार चिन्हांकित आणि मार्गदर्शनासाठी कर्मचारी तैनात करावेत. मतदान सामग्रीची संपूर्ण तयारी आणि व्यवस्थित वितरण सुनिश्चित करावे. मतदान प्रक्रियेतील प्रशासकीय अडचणी, तक्रारी किंवा शंका तत्काळ निवारण कराव्यात. मतदान केंद्रांवर सर्व कर्मचारी आणि स्वयंसेवकांची योग्य भूमिका स्पष्ट करावी. या पाहणी दरम्यान उपायुक्त दादाराव डोलारकर, पोलीस अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, विविध खात्यांचे विभागप्रमुख, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित बातम्या

Back to top button