रतन इंडिया प्रकल्पात कंत्राटी कामगारांवर अन्याय

आ. राजेश वानखडे यांना कामगारांचे निवेदन

नांदगाव पेठ/ 20 जुलै  : नांदगाव पेठ एमआयडीसीमधील रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पा अंतर्गत कार्यरत दिल्ली मॅनेजमेंट फॅसिलिटी या सब-कॉन्ट्रॅक्ट कंपनीतील कंत्राटी सफाई कामगारांना गेल्या काही महिन्यांपासून अन्याय सहन करावा लागत आहे. यासंदर्भात तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांना भाजपचे नागेंद्र तायडे यांच्या नेतृत्वात आज कामगारांनी निवेदन सादर केले.
डीएमएफमध्ये आजूबाजूच्या गावांतील कामगार मागील सात वर्षांपासून सफाई कामगार म्हणून कार्यरत आहेत. मात्र, गेल्या 3-4 महिन्यांपासून डीएमएफ कंपनीचे कामकाज थांबले असून, कामगारांना अजूनही एक वर्षाचा बोनस व संपूर्ण सात वर्षांची ग्रॅज्युटी मिळालेली नाही. यासंदर्भात कामगारांनी कामगार आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी दिल्या, पण अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी आज भाजपचे विवेक गुल्हाने, वीरेंद्र लंगडे आणि नागेंद्र तायडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार राजेश  वानखडे यांची भेट घेतली. आमदार वानखडे यांनी यासंदर्भात सकारात्मक चर्चा करून कामगारांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. कामगारांनी एकजुटीने राहिले पाहिजे. तुमचा हक्काचा पैसा मिळवून देण्यासाठी मी तातडीने पावले उचलणार आहे, असे ठाम आश्वासन यावेळी आ. वानखडे यांनी दिले.

संबंधित बातम्या

Back to top button