अमानवीय पद्धतीने गोवंशाची वाहतूक, 9 पशु दगावले
कत्तलीसाठी मध्यप्रदेशातून तस्करी

-मोर्शी पोलिसांनी वाचविले 34 जनावरांचे प्राण
-बजरंग दल कार्यकर्त्यांचा पुढकार
-दोघांना अटक, 32 लाखांचा मुद्देमाल जप्त
मोर्शी / 14 जुलै: आयशर ट्रकमध्ये अमानवीय पद्धतीने अक्षरश: निर्दयपणे कोंबून कत्तलीसाठी नेण्याचा डाव आज मोर्शी पोलिसांनी उधळून लावला. हा ट्रक ताब्यात घेउन पोलिसांनी 34 गोवंशांची सुटका केली आणि त्यांचे प्राण वाचविले. मात्र दुर्दैवाने ट्रकमधील 9 पशुंचा मृत्यु झाला होता. मोर्शी-चांदुर बाजार मार्गावरील वरला या गावाजवळ पोलिसांनी आज सोमवारी, दुपारी 2 वाजताच्या सुमारास ही कारवाई केली. ट्रकचालकासह दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून एकुण 30 ते 32 लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये मोर्शी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनीही पोलिसांना सहकार्य केले. उल्लेखनीय बाब अशी की, तणसाचे पोते भरुन ट्रकमध्ये दोन भाग करण्यात आले होते. कोणाला दिसू नये याकरिता गोवंश तस्करांनी जनावरे मागील बाजून कोंबून ठेवली होती.
मध्यप्रदेशातून मोर्शी मार्गे अमरावती जिल्ह्यात गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. आज दुपारी एमएच 27 / सीटी 4811 क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून 43 गोवंशातील पशुंची अमानवीय पद्धतीने वाहतूक केली जात असल्याची माहिती मोर्शी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती. मध्यप्रदेशातून ही जनावरे चांदूर बाजार येथे नेली जात असल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी याबाबत मोर्शी पोलिसांना सुचना दिली. पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांसह या ट्रकचा शोध सुरु केला. चांदुर बाजार मार्गावर ट्रक नजरेस पडताच पाठलाग करुन वरला गावाजवळ त्याला गाठण्यात आले.
ट्रकची झडती घेतली असता तणसाच्या पोत्यांमागे गोवंशाला अमानवीय पद्धतीने कोंबण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. त्यात गाय, कालवड, गोर्हे या गोवंशाचा समावेश होता. सर्व 43 गोवंशीय जनावरांना ट्रकमधून बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 9 जनावरांचा श्वास कोंडून व जखमी होवून मृत्यु झाला होता. अन्य जनावरांना उपचार व संगोपनासाठी केकतपूर येथील गौरक्षणमध्ये पाठविण्यात आले. या जनावरांची तस्करी करणार्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. सिद्दिकी रईस खान व युसूफ कुरेशी आरिफ कुरेशी अशी आरोपींची नावे असून ते मध्यप्रदेशातील रहिवासी आहेत.
ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अप्पर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनात आणि मोर्शीचे पोलीस निरीक्षक सुरज बोंडे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरिक्षक आकाश शिवणकर, तुषार चव्हाण, हेकॉ छत्रपती करपते, स्वप्निल बायस्कर, अथर्व कोहळे यांच्या पथकाने केली.




