इंदिरा गांधींची मुख्यमंत्री पदाची ऑफर रा.सू.गवईंनी नाकारली

काँग्रेसमध्ये प्रवेशास नकार; राजेंद्र गवईंचा गौप्यस्फोट

* राजकीय विचारधारा वेगळी, पण संबंध कायम
* गवई कुटुंबाने संघाचे निमंत्रण स्वीकारले

अमरावती / 29 सप्टेंबर : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर जाण्यासाठी राजकीय खेळी कशा खेळल्या जातात, हे मागील काही वर्षांत संपूर्ण देशाने पाहिले आहे. पक्ष आणि विचारधारा बाजूला ठेवून अनेक वेळा सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येणे ही सामान्य गोष्ट झाली आहे. या सगळ्या राजकीय वळणांमध्ये एक महत्त्वाची घडामोड घडली आहे. रिपब्लिकन पक्षाचे नेते व राज्यपाल दिवंगत रा.सू. गवई यांनी इंदिरा गांधींच्या मुख्यमंत्री पदाच्या ऑफरला नकार दिला होता, याबाबतचा गौप्यस्फोट त्यांच्या चिरंजीव डॉ. राजेंद्र गवई यांनी केला आहे. रा.सू. गवई यांच्या पत्नी व सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री कमलताई गवई यांना संघाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण आले होते. रविवारी कमलताई कार्यक्रमाला जाणार नाहीत, असा भ्रम निर्माण झाला होता. मात्र राजेंद्र गवईंनी स्पष्ट केले की, कमलताई यांना संघाने दिलेले निमंत्रण आमच्या परिवाराने स्वीकारले आहे. डॉ. गवई यांनी सांगितले की, वैचारिक मतभेद असले तरी प्रत्येक कार्यक्रमाला जायला हवे, आणि कार्यक्रमात जाणे म्हणजे विचारधारा बदलणे नाही. राजेंद्र गवई म्हणाले की, इंदिरा गांधींनी रा.सू. गवईंना काँग्रेसमध्ये प्रवेश करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याची ऑफर दिली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. 2014 मध्ये सोनीया गांधी आणि नंतर 2019 मध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लीकार्जून खरगे यांनी त्यांना खासदारकीची ऑफर दिली होती. मात्र गवई परिवाराने आपली वैचारिक निष्ठा राखली आणि कधीही विचारधारा बदलली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल घडले. 2019 मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे सरकार स्थापन झाले, ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले; मात्र अडीच वर्षांत हे सरकार कोसळले. पुढे शिवसेना फुटली व भाजपसोबत हातमिळवणी करून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांचा वेगळा गट तयार झाला. अशा परिस्थितीतही रा.सू. गवईंनी काँग्रेसमध्ये न जाण्याचा निर्णय घेतला, असा खुलासा राजेंद्र गवई यांनी केला. रा.सू. गवई यांचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी जवळचे संबंध होते. मुख्यमंत्र्यांचे वडील गंगाधर फडणवीस यांच्याशीही गवईंचे भावासारखे संबंध होते. राजेंद्र गवई यांनी म्हटले की, वैयक्तिक आणि वैचारिक संबंध वेगवेगळे असतात, आणि प्रत्येक पक्षातील कार्यक्रमाला जाणे ही एक सुसंस्कृत परंपरा आहे.

संबंधित बातम्या

Back to top button