शहरात डेंग्यू, चिकनगुनिया रुग्णांमध्ये वाढ

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अमरावती /23 जानेवारी अमरावती जिल्ह्यात गेल्या वर्षभरात कीटकजन्य आजारांनी डोके वर काढले असून आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार डेंग्यूचे 364 तर चिकनगुनियाचे 304 रुग्ण आढळल्याने खळबळ माजली आहे. विशेषतः पावसाळ्याच्या कालावधीत दूषित वातावरणामुळे या संसर्गाचा जोर सर्वाधिक राहिला असून ग्रामीण भागात शहराच्या तुलनेत रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा हिवताप विभागाने दिलेल्या माहितीनुसार 2025 या वर्षात डेंग्यू आणि चिकनगुनियासोबतच हिवतापाचे 146 रुग्ण नोंदवण्यात आले असले तरी ही संख्या 2024 च्या तुलनेत काहीशी कमी असल्याने प्रशासनाला अल्पसा दिलासा मिळाला आहे. मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात स्क्रब टायफससारख्या धोकादायक आजाराने शिरकाव केल्याने आणि त्यात एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेपुढील आव्हाने वाढली आहेत.
जिल्ह्यात जानेवारीपासून सुरू झालेला हा आजारांचा प्रवास पावसाळ्यात अत्यंत तीव्र झाला. डेंग्यूच्या एकूण 364 रुग्णांपैकी 267 रुग्ण हे ग्रामीण भागातील असून 97 रुग्ण महापालिका क्षेत्रातील आहेत. चिकनगुनियाची स्थिती देखील अशीच असून ग्रामीण भागात 237 तर शहरात 67 रुग्ण बाधित आढळले. पावसाळ्यात साचलेले पाणी आणि बदलत्या हवामानामुळे डासांची पैदास वाढल्याने ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात रुग्णसंख्या उच्चांकावर पोहोचली होती. आरोग्य विभागाकडून धूर फवारणी, अळीनाशक फवारणी आणि गप्पी मासे सोडण्यासारखे प्रतिबंधात्मक उपाय राबवण्यात आले असले तरी नागरिकांच्या स्तरावर ’कोरडा दिवस’ पाळण्याबाबत अनास्था दिसून येत आहे. घरात कुलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्या आणि बादल्यांमध्ये साचलेले पाणी वेळीच उपसणे आवश्यक आहे. हिवताप विभागाने केलेल्या जनजागृतीनंतरही पावसाळी आजार रोखण्यात प्रशासनाला पूर्णतः यश आलेले नाही.

संबंधित बातम्या

Back to top button