लाइफस्टाईल मॉडिफिकेशन गाईडन्स सेंटर’चे उद्घाटन

डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे आयोजन

अमरावती /14 डिसेंबर : श्री शिवाजी शिक्षण संस्था द्वारा संचालित डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धनजी देशमुख यांचे मार्गदर्शनात फिजिओलॉजी विभागांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या लाइफस्टाईल मॉडिफिकेशन गाईडन्स सेंटरचे उद्घाटन बुधवार दिनांक 03 डिसेंबर 2025 रोजी प्रयास संस्थेचे संस्थापक डॉ. अविनाश सावजी यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अनिल देशमुख होते.
उद्घाटन प्रसंगी विभागप्रमुख डॉ.सुषमा पांडे यांनी लाइफस्टाईल मॉडिफिकेशन ही संतुलित आहार, नियमित व्यायाम, तणावनियंत्रण, पुरेशी झोप, वजनसंयमन, तंबाखू व व्यसनापासून दूर राहणे आणि आरोग्यदायी दिनचर्या राखणे अशी सर्वसमावेशक संकल्पना असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी आधुनिक जीवनशैलीशी संबंधित वाढत्या आजारांची चर्चा करत, अशा प्रकारचे मार्गदर्शन केंद्र रुग्णांसह विद्यार्थी व समाजासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असे सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. अविनाश सावजी यांनी आपले विविध संशोधन, आधुनिक संकल्पना आणि ‘लाइफस्टाईल इंटरव्हेन्शन’द्वारे मिळालेले प्रभावी रुग्णपरिणाम यांची माहिती दिली. त्यांनी हृदयरोग, मधुमेह, स्थूलता आणि उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांमध्ये औषधोपचारासोबतच योग्य जीवनशैली बदल किती निर्णायक असतो हे प्रत्यक्ष उदाहरणांनी स्पष्ट केले. त्यांनी निदर्शनास आणून दिले की-यशस्वी वैद्यकीय उपचारांमध्ये औषधांइतकाच जीवनशैलीतील बदल हा आवश्यक घटक आहे. अधिष्ठाता डॉ. ए. टी. देशमुख यांनी आपल्या मनोगतात लाइफस्टाईल मॉडिफिकेशन हे आधुनिक वैद्यकशास्त्राचा अविभाज्य भाग ठरावे, अशी गरज व्यक्त केली. त्यांनी अधोरेखित केले की भविष्यात आरोग्यसेवेचे केंद्रबिंदू ‘रोगनिवारण’ न राहता ‘रोगप्रतिबंध’ असले पाहिजे आणि त्यासाठी अशा केंद्रांची स्थापनाकरणे अत्यंत आवश्यक आहे.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ मंजुषा देशमुख यांनी केले व उपस्थितांचे आभार डायटिशियन डॉ.उज्वला ढेवळे यांनी मानले. आभार डायटिशियन डॉ.उज्वला ढेवळे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता फिजिओलॉजी विभागाचे शिक्षक डॉ. एस एस पांडे, डॉ एस एम वावगे, डॉ व्ही आर पराते, डॉ. पी एच टोलानी, डॉ. एस एन निवाने, डॉ एस एस व्यास, डॉ. ए व्ही शिरभाते डॉ. एन ए भुईभार, डायटेशिअन डॉ उज्वला ढेवले यांनी परिश्रम घेतले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी एच एम बंड, एस टी झांबरे, डी डी कावरे, ए जे सदार ए जवंजाळ ए जी साबळे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमास अध्यापकवर्ग, पदव्युत्तर विद्यार्थी, कर्मचारीवर्ग आणि रुग्णांनी उपस्थिती लावली.

संबंधित बातम्या

Back to top button