अमरावतीत अजित पवारांची राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार
विदर्भात दोन महापालिकेत राष्ट्रवादीची महायुती

* चार महापालिकांमध्ये भाजप-शिवसेना युती
* राष्ट्रवादी काँग्रेसला दोन महापालिकांतच सहभाग
* नागपूर, अकोला, चंद्रपूरचा निर्णयही ठरला
* अमरावतीत भाजपा-शिंदेसेना-युवा स्वाभिमानी पक्षाची संयुक्त लढाई
अमरावती /26 डिसेंबर – विदर्भातील चार महापालिकामध्ये नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती – यासाठी महायुतीचे स्वरूप आता निश्चित झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेना सर्व महापालिकांमध्ये युतीत लढणार आहेत, तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ दोन महापालिकांमध्येच सहभागी होण्याचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहचला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर आणि अकोलामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) महायुतीचा भाग असेल, तर नागपूर आणि अमरावतीमध्ये ती स्वतंत्रपणे लढणार आहे. विशेष म्हणजे अमरावती महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्यामुळे येथे महायुतीत फेरबदल झाला आहे.
अमरावतीत भाजप-शिंदेसेना-युवा स्वाभिमानी पक्ष युतीत: अमरावतीत भाजप-शिंदेसेना युतीत आमदार रवी राणांचा युवा स्वाभिमानी पक्षही सहभागी होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. या युतीबाबत शिंदेसेना-भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली असून, निर्णय घेण्यात आला आहे की चारही महापालिकांमध्ये एकत्र लढण्याची रणनीती ठरवली जाईल.शिंदेसेना नेते उदय सामंत यांनी सांगितले, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यामध्ये चारही महापालिकांमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली. अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर या चारही महापालिकांमध्ये शिवसेनेचा मानसन्मान राखला जाईल. एकत्र लढण्याचे ठोस निर्णय घेतले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, चारही महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप महायुती निश्चित झाली आहे. उद्या संध्याकाळपर्यंत जागावाटप पूर्ण होईल. अकोलामध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीत येणार आहेत, तर अमरावतीमध्ये युवा स्वाभिमानी पक्ष सहभागी होत असल्यामुळे राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहेत. चंद्रपूरमध्येही राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी होऊ शकते. विदर्भातील ही निवडणूक स्थानिक राजकारणासाठी महत्त्वाची असून, युतीचे अंतिम स्वरूप ठरल्यामुळे पक्षांच्या रणनीती स्पष्ट होत आहेत. नागपूर आणि अमरावतीत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढणार असल्यामुळे या महापालिकांमध्ये राजकीय संघर्ष अधिक गडद होण्याची शक्यता आहे. याउलट, अकोला आणि चंद्रपूरमध्ये राष्ट्रवादी महायुतीत असल्यामुळे येथे युतीकडून एकत्रित ताकद दिसेल. अमरावतीत भाजप-शिंदेसेना-युवा स्वाभिमानी पक्ष युतीत लढणार असल्यामुळे पक्षांच्या उमेदवारांच्या जागावाटपाबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होईल. विदर्भातील चारही महापालिकांमध्ये या निवडणुकीचा परिणाम स्थानिक तसेच राज्यस्तरीय राजकारणावर परिणाम करणार आहे.




