ई-सिगरेटची अवैध विक्री, आरोपीला अटक

4.35 लाखांचा मुद्देमाल जप्त

-गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती / 17 जून: आरोग्यासाठी अत्यंत घातक असलेल्या प्रतिबंधित विदेशी बनावटीच्या ई-सिगरेटची अवैधरीत्या विक्री करित असलेल्या युवकाला शहर गुन्े शाखेच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. त्याच्याजवळून 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. जय लालचंद लोहानी (31, कृष्णानगर, गल्ली नं. 5) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
विदेशी बनावटीच्या ई-सिगरेट या आरोग्यासाठी अत्यंत घातक असल्या आणि त्यावर प्रतिबंध असला तरी युवा वर्ग प्रामुख्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी त्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. अनेक युवक तर या व्यसनाच्या अधीन गेलेले बघायला मिळत आहे. अमरावती शहरातही या ई-सिगरेटची चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पाळत ठेवण्याचे आदेश पोलिस आयुक्त अरविंद चावरिया यांनी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाला दिले होते. दरम्यान आज दुपारी एक युवक कॉटन मार्केट ते जयस्तंभ मार्गावर रस्त्याच्या कडेला उभा राहून ई-सिगरेटची विक्री करित असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली.
त्यानंतर गुन्हे शाखेने तात्काळ या भागात धडक देवून आरोपी युवकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव जय लालचंद लोहानी असे सांगितले. त्याच्याजवळ वेगवेगळ्या कंपन्यांच्या विदेशी बनावटीच्या ई-सिंगरेट आढळून आल्या. पोलिसांनी जय लोहानी याच्याकडून 4 लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील कारवाईसाठी त्याला शहर कोतवाली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. जय लोहानी हा आपल्या ग्राहकांना ऑनकॉल मागणीवरुन ई-सिगरेट उपलब्ध करुन देत होता, अशी माहिती समोर आली आहे. त्याचे कुठेही दुकान नाही. ग्राहकांना त्याने मोबाईल क्रमांक देवून ठेवला होता. त्यावरुन संपर्क करुन मागणी केल्यानंतर जय त्यांना ई-सिगरेट उपलब्ध करुन द्यायचा, असे पोलिसांनी सांगितले.
त्याच्याजवळ वेगवेगळ्या विदेशी कंपन्यांच्या आणि विविध फ्लेवरच्या ई-सिगरेट असायच्या. शालेय व महाविद्यालयीन युवक प्रामुख्याने जय लोहानीचे ग्राहक आहेत. जयच्या या कारनाम्यांची माहिती पोलिसांना आधीच होती. पोलिस त्याच्यावर पाळत ठेवूनच होते. आज त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांनी त्याचा पर्दाफाश केला. आरोपी जयवर विविध कलमांतर्गत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, उपायुक्त कल्पना बारवकर, सागर पाटील व गणेश शिंदे तसेच सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनात आणि गुन्हे शाखा प्रशासन विभागाच्या निरिक्षक सीमा दाताळकर यांच्या नेतृत्वात एपीआय इमरान नायकवडे, एएसआय विनय मोहोड व विनय गुप्ता, हेकाँ. छोटेलाल यादव, अजय मिश्रा, मंगेश लोखंडे, मंगेश परिमल, संजय भारसाकळे, नईम बेग, चेतन कराळे, रुपेश काळे, लखन खुशराज, नरेश मोहरील, मयुर बोरेकर, रामकृष्ण कांगडे यांनी केली.

संबंधित बातम्या

Back to top button