अवैध होर्डिंग लावणार्यांवर आता फौजदारी कारवाई
संबंधितांवर गुन्हे दाखल करणार

-मनपा आयुक्तांचा इशारा
-रविनगर भागात अवैध फलक हटविले
अमरावती / 30 जून: फ्लेक्स, बॅनर, होर्डींग वर मुद्रक व प्रकाशकाचे नाव टाकणे तसेच बाजार व परवाना विभाग, महानगरपालिका यांची परवानगी घेणे अनिवार्य आहे. अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डींग लावून वाहतूकीला अडथळा निर्माण करणार्यांवर फौजदारी कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. असा प्रकार करणार्या संबंधित व्यक्तींनी शहरात विना परवानगी फ्लेक्स, बॅनर, होर्डींग लावले असतील तर ते स्वत:च काढून टाकावे. अन्यथा महापालिका असे फलक हटविण्याची कारवाई करेल व संबंधितांना फौजदारी कारवाईला सामोरा जावे लागेल, असा स्पष्ट इशारा महापालिका आयुक्त सौम्या शर्मा यांनी दिला आहे.
होर्डींगची स्टॅबलीटी तपासण्याचे आणि जे होंर्डीग अनधिकृत ठरत असतील ते काढण्याचे निर्देश आयुक्तांनी महापालिका प्रशासनाला आधीच दिले होते. बाजार व परवाना विभागाच्या होर्डीगबाबत ज्या अटी आहे जे पुर्ण करतील त्यांना होंर्डीगचे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे. बाजार व परवाना विभाग व अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डींग काढण्याचे कारवाई निरंतर सुरु ठेवावी, अशा स्पष्ट सुचना देण्यात आल्या होत्या. कोणीही अनधिकृत फ्लेक्स, बॅनर, होर्डींग शहरात लावू नये अन्यथा संबंधीतांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल. असे मनपा आयुक्तांनी म्हटले आहे.
मनपा आयुक्त यांच्या आदेशानुसार आज 30 जुन रोजी शहरातील रविनगर मार्गावरील अनधिकृत फलक जेसीबीद्वारे हटविण्याची कार्यवाही करण्यात आली. त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन विभागाने बाजार परवाना विभागाकडून परवानाधारक होर्डींगची माहिती प्राप्त करुन घेतली. त्यानंतर अनधिकृत होर्डींग हटविण्याच्या कार्यवाहीला सुरुवात केली गेली. अनधिकृत फलक हटविण्याची कारवाई बाजार व परवाना विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी केली.
-पूर्व भागात अतिक्रमन हटविले
वाहतुकीस अडथळा ठरणार्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. सोमवारी सकाळी मालटेकडी ते काँग्रेस नगर पर्यंत अतिक्रमण निर्मूलन पथकाने मोहीम सुरू केली. रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय करणार्या व्यावसायिकांचे निळे खोके आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईसाठी जेसीबीचा वापर करण्यात आला. या कारवाईत, अतिक्रमण निर्मूलन पथकासोबत पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. ही मोहीम शहराच्या इतर भागांमध्येही राबवण्यात येणार आहे. 9 अनधिकृत खोके जप्त करुन 2 ट्रकधून नेण्यात आले.




