नांदगाव पेठमध्ये अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश

पोलिसांची धडक कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

नांदगाव पेठ/ 12 सप्टेंबर : नांदगाव पेठ परिसरातील शासकीय वसाहतीत पोलिसांनी मोठी धडक कारवाई करत अवैध गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. 12 सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी अचानक धाड टाकली असता, एका घरात एलपीजी सिलेंडरची मोठ्या प्रमाणावर साठवणूक करून मशीनद्वारे अवैधरित्या रिफिलिंग सुरू असल्याचे उघड झाले.
कारवाईदरम्यान 58 एलपीजी सिलेंडर, 3 रिफिलिंग मशीन, 2 मोठे वजन काटे असा जवळपास 4 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी साबीर लष्कर हासिम लष्कर (40, रा. शासकीय वसाहत, नांदगाव पेठ) यास ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू आहे. सिलेंडरची अवैध साठवणूक आणि मशीनद्वारे केलेले बेकायदेशीर रिफिलिंग यामुळे कोणत्याही क्षणी भीषण स्फोट होण्याची शक्यता होती. या गोरखधंद्यातून ऑटोचालक व काही ग्राहकांना रिफिल केलेले सिलेंडर विकले जात असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी केले. उपायुक्त गणेश शिंदे व सपोआ कैलास पुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई पार पडली. कारवाईत पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे, उपनिरिक्षक नवलकर, पोहेका राऊत, पो.शि. निलेश साविकार, राजा सय्यद, राजिक खान व वैभव तिखीले यांनी सक्रिय सहभाग घेतला. अवैध गॅस रॅकेटचा पर्दाफाश झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. नागरिकांनी पोलिसांचे कौतुक करत अशा धाडसी मोहिमा कायम सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या

Back to top button