अवैध गौवंश तस्करीवर ग्रामीण पोलीसांची धडक
13 जनावरे; लाखोंचा मुद्देमाल जप्त

-मोर्शी व शिरजगाव कसबा परिसरात कारवाई
अमरावती / 28 ऑगस्ट : जिल्ह्यात ग्रामीण भागात सतत वाढत असलेल्या अवैध गौवंश तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी गस्त व पेट्रोलिंग तीव्र केले असून, त्यातून दोन वेगवेगळ्या कारवायांत मोठी यशस्वी धडक दिली आहे. मोर्शी व शिरजगाव कसबा पोलीस ठाणे हद्दीतून करण्यात आलेल्या या कारवायांत 13 जनावरे सकुशल सोडवण्यात आली असून, तब्बल साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी मात्र पोलिसांना चकवा देत पसार झाले.
मोर्शी पोलीस ठाणे हद्दीत ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकाला गुप्त माहिती मिळाल्यानंतर मायवाडी फाट्याजवळ नाकाबंदी करण्यात आली. दरम्यान, वरुडहून मोर्शीकडे येणारा बोलेरो पिकअप थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला असता चालकाने वाहनाला यू-टर्न देत पलायन केले. हे वाहन हिवरखेड-लोणी मार्गावरून अनियंत्रित होऊन विद्युत खांबाला धडकले व थांबले. त्यानंतर वाहनाची तपासणी केली असता आत 7 बैल व 3 गायी निर्दयपणे बांधून कोंबलेल्या अवस्थेत आढळल्या.
पथकाने ही सर्व जनावरे सकुशल बाहेर काढली. या कारवाईत साडेपाच लाख रुपये किंमतीचा बोलेरो पिकअप आणि सुमारे एक लाख सात हजार रुपयांची जनावरे असा एकूण 6 लाख 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत, ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय विशाल रोकडे व त्यांच्या सहकार्यांनी केली.
तसेच 26 ऑगस्ट रोजी शिरजगाव कसबा पोलीस ठाणे क्षेत्रात कारवाई करण्यात आली. पाळा-शिरजगाव मार्गावर स्मशानभूमीजवळ 3 गौवंशीय जनावरे कटाईसाठी नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी नाकाबंदी करून ताबा घेतला व 43 हजार रुपयांचा मुद्देमाल वाचवला. या प्रकरणात सरफराज (35, शिरजगाव कसबा), बबलू जावरकर (30, पिपलनाका, जि. बैतूल, म.प्र.) व आणखी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईचे नेतृत्व एपीआय महेंद्र गवई यांनी केले असून, त्यांना पोलीस कर्मचारी दिपेश चंदेश, अर्जून परिहार, अजय कुंभरे व योगेश राखोंडे यांचे सक्रिय सहकार्य लाभले.




