संविधान नाकारले तर मोठी किंमत मोजावी लागेल

डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेत डॉ.अविनाश पाटील यांचे व्याख्यान

अमरावती / 25 डिसेंबर संविधान हा आपल्या देशातील लोकांनी स्वतःप्रत केलेला करार आहे आणि तो टिकवायचा असेल तर संविधानाकडे निकोपपणे पाहण्याची गरज आहे. संविधान नाकारले तर मोठी किंमत मोजावी लागेल आणि क्षणिक लोभापायी आपण पुढच्या पिढीचे भवितव्य धोक्यात टाकू, तेंव्हा संविधान समजून घ्या, असे आवाहन विवेकनामा फाउंडेशन, धुळेचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले.
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती उत्सवानिमित्त मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात आयोजित डॉ.पंजाबराव देशमुख व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख हे होते. ‘भारतीय संविधान व लोकशाहीपुढील आव्हाने’ या विषयावर बोलताना अविनाश पाटील म्हणाले की, संविधानापलीकडे काही वेगळी यंत्रणा आहे आणि त्या आधारावर कारभार चालतो असे आजचे चित्र आहे.एक अदृश्य शक्ती काम करत आहे जी संविधानाने निर्माण केलेल्या यंत्रणाच्या पलीकडे आहे,पुढे पूर्ण कारभार या शक्तीच्या हातात जाईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे.संविधानसंबंधीचे काही गैरसमज असून आपण संविधानाकडे निकोपपणे बघतो की नाही असे जाणवते. संविधानाबाबत गैरसमज पसरविल्या गेले आणि आजही जात आहेत, असेही पाटील म्हणाले. आपल्याला संविधान समजून घेण्याची गरज वाटली नाही कारण आपल्याला जे पाहिजे ते सहज मिळत गेले.आपल्या पिढ्यांनी केवळ संविधानाचे फायदेच घेतले.या देशाचा कारभार राजकीय नेते नव्हे तर प्रशासकीय नेते चालवितात.देशातील सर्वच व्यवस्थांची हास्यास्पद अवस्था असून प्रशासकीय यंत्रणेने त्यांना हात लागणार अशी व्यवस्था करून ठेवली आहे.संविधानाबाबत लोकशाहीत व प्रशासनात काही अंधश्रद्धा तयार केल्या गेल्या आहेत. आणि लाभार्थी समूहाकडून सुद्धा त्या तयार केल्या गेल्या आहेत.अशा वेळी संविधान समजून घेण्याकरिता संविधान सभेतील चर्चा वाचणे आवश्यक आहे, अत्यंत कमी शब्दात मांडलेली संविधानाची उद्धेशिका ही एखाद्या महाकाव्यासारखी आहे.असेही ते म्हणाले. शिक्षित समाजाचा संविधाना संदर्भातला दृष्टीकोन नकारात्मक असणे ही शोकांतिका असून ही उदासीनता कशी दूर करता येईल असा प्रयत्न शिव परिवाराकडून करू, असे व्याख्यानाचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख आपल्या भाषणात म्हणाले.यावेळी अविनाश पाटील यांचा शाल, ग्रंथ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देउइन सत्कार करण्यात आला.व्याख्यानाचे प्रास्ताविक श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अंबादास कुलट यांनी केले तर डॉ.राजेश मिरगे पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ.प्रशांत हरमकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ.जयराम गायकवाड यांनी केले व डॉ.अपर्णा सरोदे यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या

Back to top button