मी उद्या असेन नसेन, पण माझे विचार जिवंत राहतील!
देशहित सर्वोपरी! ‘जिंदा शहीद’ मनिंदरजीतसिंग बिट्टा यांची रोखठोक मुलाखत

* दहशतवाद्यांशी दोन हात करताना प्राणाची बाजी लावणार्या शूरवीराची चित्तथरारक कथा पॉडकास्टने हेरली
* पाच दशकांचा राजकीय प्रवास आणि देशप्रेमाची धग, अनेक मुद्द्यांवर दिलखुलास चचा
अमरावती /6 मार्च – दहशतवादा विरुद्धच्या संघर्षाचे प्रतीक मानले जाणारे ’जिंदा शहीद’ मनिंदरजीतसिंग बिट्टा यांनी अमरावती दौर्यावर असताना ’दैनिक आपली मातृभूमि’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी ’आपली मातृभूमि’ आणि ’मंडल न्यूज’चे संपादक अनिल अग्रवाल यांच्याशी ’पॉडकास्ट’मध्ये झालेल्या खास बातचीतमध्ये एम. एस. बिट्टा यांनी आपल्या जीवनाला ’बोनसचे जीवन’ असल्याचे सांगितले. माझ्या पात्राचा खून झाला तरी चालेल, पण माझे विचार जिवंत राहतील, असे ते म्हणाले. या ओळींतून बिट्टा यांना हेच सांगायचे होते की, आपल्या संपूर्ण सार्वजनिक जीवनात ते दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिले आणि जर दहशतवादी त्यांना मारण्यात यशस्वी झाले असते, तरीही त्यांचा हेतू साध्य झाला नसता. कारण, बिट्टा यांनी दहशतवादाविरुद्ध मांडलेले विचार तेव्हाही जिवंत राहिले असते आणि समाजाचा दहशतवाद्यां विरुद्धचा लढा सुरूच राहिला असता. ’अखिल भारतीय दहशतवाद विरोधी मोर्चा’चे राष्ट्रीय संयोजक मनिंदरजीतसिंग बिट्टा यांनी ’आपली मातृभूमि’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपल्या पाच दशकांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचे अनुभव सविस्तरपणे मांडले. बिट्टा म्हणाले की, त्यांच्या जीवनाचा मूळ मंत्र नेहमीच ’पक्षापेक्षा पद आणि प्राणापेक्षा राष्ट्र प्रथम’ हा राहिला आहे. देशाची सुरक्षा, सामर्थ्य आणि सन्मानाशी कोणत्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यांच्या मते, दहशतवादाविरुद्धचा लढा केवळ सरकार किंवा सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून, ती संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. देशाच्या सामर्थ्य आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड मंजूर नाही या विशेष मुलाखतीत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ’जिंदा शहीद’ एम. एस. बिट्टा यांनी स्पष्टपणे मान्य केले की, एकेकाळी पंजाबमध्ये खलिस्तानच्या मागणीवरून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मोठा प्रभाव होता. त्याचबरोबर काश्मीरला भारतापासून तोडण्यासाठी खोर्यातही पाकिस्तानच्या इशार्यावर राष्ट्रविरोधी शक्ती सक्रिय होत्या. अशा शक्तींविरुद्ध उघडपणे आवाज उठवल्यामुळे त्यांना अनेकदा जीवघेण्या हल्ल्यांना सामोरे जावे लागले. यातील 14 मोठे हल्ले तर अधिकृत रेकॉर्डवर नोंदवलेले आहेत, तर छोट्या-मोठ्या हल्ल्यांची संख्या शेकडोमध्ये सांगता येईल. मात्र, या घटनांनी त्यांचा धीर खचण्याऐवजी तो अधिक मजबूत झाला. दहशतवादाविरुद्धचा संघर्ष हा केवळ राजकीय विषय नसून राष्ट्राची अस्मिता आणि भविष्याशी संबंधित मुद्दा आहे, असेही त्यांनी नमूद केले.
युवकांनी इतिहास घडवावा जगात देशाचे नाव मोठे करावे -युवकांना संदेश देताना एम. एस. बिट्टा म्हणाले की, आजचा भारत संधींनी भरलेला आहे आणि देशातील युवकांमध्ये इतिहास घडवण्याची क्षमता आहे. जर युवकांनी आपल्या सामर्थ्याचा योग्य दिशेने वापर केला, तर ते जगभरात भारताचा डंका वाजवू शकतात. युवकांनी आपल्या वेळेचा आणि क्षमतेचा सार्थ व सकारात्मक वापर करून राष्ट्रनिर्मितीच्या कार्यात योगदान द्यावे, तरच आपला देश बलशाली, गौरवशाली आणि समृद्ध होईल.
अध्यात्म आणि अहिंसेचा संदेश देणार्या जैन धर्माचा प्रभाव-दहशतवादाविरुद्ध प्रखर भूमिका मांडणारे आणि दीर्घकाळ मुख्य प्रवाहातील राजकारणात सक्रिय राहिलेले मनिंदरजीतसिंग बिट्टा यांचा ओढा सध्या अध्यात्माकडे वाढला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, त्यांचा अध्यात्माशी जुना संबंध आहे. त्यांची शीख आणि हिंदू धर्मावर पूर्ण श्रद्धा आहे. सध्या ते अहिंसा आणि करुणेचा संदेश देणार्या जैन धर्मामुळे खूप प्रभावित आहेत, कारण जैन धर्माने जगाला ’जगा आणि जगू द्या’ हा मानवी संदेश दिला आहे. बिट्टा यांनी देशातील सर्व प्रमुख हिंदू आणि शीख तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या असून, गेल्या काही वर्षांत त्यांनी अनेक जैन तीर्थक्षेत्रांचेही दर्शन घेतले आहे. अध्यात्म व्यक्तीला संयम, संतुलन आणि सकारात्मक दृष्टी प्रदान करते, असे त्यांनी सांगितले.
सदिच्छा भेटीदरम्यान संपादक अनिल अग्रवाल, सँड अँड स्टोनचे संचालक ऋषी राजेश अग्रवाल आणि प्रणय अनिल अग्रवाल यांच्यासोबत ’झिंदा शहीद’ मनिंदरजीतसिंग बिट्टा. यावेळी संपादक अनिल अग्रवाल यांनी बिट्टा यांचा भावपूर्ण सत्कार केला.
बिट्टा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी ’सुपर पीएम’
2014 नंतर देशातील परिस्थिती सुधारल्याचा आणि बदलल्याचा केला दावा या मुलाखतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे माजी काँग्रेस नेते बिट्टा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक केले. ते म्हणाले की, 2014 पूर्वी देशात कुठेही दहशतवादी हल्ले आणि बॉम्बस्फोटांच्या घटना सर्रास घडत असत. मात्र 2014 नंतर देशाची अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा व्यवस्था, जागतिक प्रतिमा आणि राष्ट्रीय आत्मविश्वास यामध्ये स्पष्ट बदल दिसून येत आहे. 2014 नंतर पहिल्यांदाच सरकारने दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्यासाठी गांभीर्य दाखवले. जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यासोबतच, नोटबंदीच्या माध्यमातून दहशतवाद आणि नक्षलवादाचे कंबरडे मोडले गेले. तसेच रामजन्मभूमी मंदिराचा मुद्दा मोदी सरकारने इतक्या चांगल्या पद्धतीने सोडवला की देशात कुठेही अनुचित प्रकार घडला नाही. पीएम नरेंद्र मोदींना ’सुपर पीएम’ संबोधत बिट्टा म्हणाले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
पक्ष आणि प्राणापेक्षा राष्ट्र प्रथम
बिट्टा यांनी स्पष्ट केले की, त्यांचा संघर्ष कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा विचारधारेच्या विरोधात नसून, तो दहशतवाद आणि राष्ट्रविरोधी शक्तींविरुद्ध आहे. देशहित हे सर्वोपरी आहे आणि याच विचाराने ते आयुष्यभर सक्रिय राहतील. त्यांनी सांगितले की, त्यांचा राजकारणाशी कधीही थेट संबंध नव्हता आणि आजही नाही; त्यांनी नेहमीच सेवाकार्याला महत्त्व दिले आहे. आपल्या आजोबांच्या प्रेरणेने त्यांनी काँग्रेस सेवा दलात गेलेे होते. पुढे दहशतवादाविरुद्ध युवकांना संघटित करण्यासाठी ते युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. त्यांना तीन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली होती, परंतु त्यांनी ती नाकारली. तसेच अनेकदा केंद्रीय मंत्री, खासदार आणि आमदार होण्याची संधीही त्यांना मिळाली, मात्र त्यांनी नम्रपणे नकार दिला. कोणत्याही पदाची त्यांना लालसा नसून, देशाच्या मजबूतीसाठी आणि दहशतवादाच्या नायनाटासाठी ते आजही कटिबद्ध आहेत.




