पती अमेरिकेत, सासर्यांचीही परदेशात जाण्याची तयारी

विवाहिता मात्र माहेरीच अडकली

-प्रताडनेला कंटाळून महिलेची तक्रार
-सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अमरावती / 12 सप्टेंबर : संसाराची स्वप्नं डोळ्यांत घेऊन नव्या आयुष्याची सुरुवात करणार्‍या एका तरुणीचा मोहभंग केवळ तीन महिन्यांतच झाला. विवाहानंतर वारंवार आजारी पडलेल्या या विवाहितेला वेळेवर उपचार न देता माहेरी धाडण्यात आले. ती बरी झाल्यावर पुन्हा सासरी गेली असता तिला घरात शिरूही दिले नाही. पती आधीच अमेरिकेत स्थायिक झाला होता, तर आता सासरे-सासूबाई देखील परदेशात जाण्याची तयारी करत असल्याचे समोर आले आहे. हताश झालेल्या विवाहितेने अखेर भरोसा सेलचा दरवाजा ठोठावत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी पतीसह सासुरवाड्यातील सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
जुन्या बायपास रोड परिसरातील तरुणीचा विवाह गणेश कॉलनीत राहणार्‍या अक्षय राठोड याच्यासोबत 6 डिसेंबर 2023 रोजी हिंदू रितीरिवाजाने झाला. सुरुवातीचे तीन महिनेच तिने सासरी काढले. या काळात ती दोनदा आजारी पडली, पण सासरच्या लोकांनी तिला दवाखान्यात नेले नाही. उपचारासाठी माहेरून पैसे आण असा दबाव तिच्यावर आणला. तब्येत अधिकच बिघडल्याने विवाहितेला अखेर माहेरी धाडण्यात आले. माहेरी उपचार घेतल्यानंतर तिला रक्ताचा कर्करोग (ल्यूकेमिया) असल्याचे स्पष्ट झाले. या काळात पती अक्षय राठोड अमेरिकेला रवाना झाला. त्याने केवळ जबाबदारी टाळली नाही, तर विवाहितेला तिच्या शरीरयष्टीवरूनही वारंवार हेटाळणी करीत मानसिक छळ केला, असे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे.
उपचारांनंतर तब्येत सुधारल्यावर विवाहितेने सासरी परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिला उंबरठ्यावरच थांबविण्यात आले. तुझा पती आता तुझ्यासोबत राहायला तयार नाही असे थेट सांगण्यात आले. त्यात भर म्हणजे, पतीने तिला सोशल मीडियावरून ब्लॉक केले आणि तिचे फोन कॉलही घेणे बंद केले. विवाहितेला पुन्हा माहेरीच आसरा घ्यावा लागला. अत्यंत मानसिक तणावाखाली असलेल्या विवाहितेने भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल केली. त्यावरून राजापेठ पोलिसांनी पती अक्षय राठोड, सासरे विजय दयाराम राठोड यांच्यासह सासू, नणंद आणि दोन आत्ये सासू अशा सहा जणांविरुद्ध बीएनएसच्या कलम 85 व 3 (5) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास राजापेठ पोलिस करीत आहेत.

संबंधित बातम्या

Back to top button