अकोल्यात टीईटी परीक्षेत शेकडो परीक्षार्थ्यांना प्रवेश नाकारला
पाच मिनिटांच्या उशिराने विद्यार्थ्यांच्या स्वप्नावर पाणी फेरले

अकोला /23 नोव्हेंबर – राज्यभरात रविवारी घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दरम्यान अकोला जिल्ह्यात शेकडो परीक्षार्थ्यांना वेळेत न पोहोच ल्याच्या कारणावरून परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. फक्त काही मिनिटांच्या उशिरा मुळे विद्यार्थ्यांना बाहेरच थांबवण्यात आल्याने संतापाची परिस्थिती निर्माण झाली. या परीक्षे साठी अकोल्यात एकूण 14 केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. मात्र समर्थ पब्लिक स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स यांसह अनेक केंद्रांवर परीक्षार्थ्यांना परीक्षा सुरू होण्यापूर्वी अर्धा तास उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. या नियमांनुसार उशिराने आलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही सूट न देता प्रवेश बंद ठेवण्यात आला. बाहेरगावाहून आलेल्या अनेक विद्यार्थ्यांना वेळेचे भान असतानाही वाहतूक, पत्ता शोधण्यात झालेला त्रास आणि केंद्रावरील गोंधळ यांमुळे उशीर झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी केंद्रावरील अव्यवस्था आणि संथ प्रक्रिया यांमुळेच प्रवेशद्वारापर्यंत पोहोचण्यास वेळ लागल्याचा आरोप केला. वर्षभर अभ्यास करून परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थ्यांना अचानक गेटवरून परत पाठवण्यात आल्याने अनेक जण भावूक झाले. फक्त पाच मिनिटांच्या उशिरामुळे एक संपूर्ण वर्ष वाया गेले, अशी प्रतिक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. या संपूर्ण बाबत परीक्षा प्राधिकरण किंवा केंद्रप्रमुखांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही. मात्र परीक्षार्थ्यांमध्ये तणाव आणि नाराजी असून पुढील काळात तक्रार नोंदवण्याचा विचार काही विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.




