अंबा-एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी
दोन दिवसात लाखो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

* महिला भाविकांची ओटी भरण्यासाठी झुंबळ
* पहाटे 4.30 वाजल्यापासून भाविकांचा पायी ओघ
अमरावती /23 सप्टेंबर : नवरात्रीच्या पहिल्या दोन दिवसांत 1,50,000 हून अधिक भाविकांनी कुलस्वामिनी अंबामाई व एकवीरा देवीचे दर्शन घेतले आहे, आणि हा आकडा सातत्याने वाढत आहे. मंगळवारी पहाटे 4:30 वाजल्यापासून भाविकांनी दर्शनासाठी एकच गर्दी केली. मोठ्या श्रद्धेने, महिला भाविकांनी देवीची ओटी भरून आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवीला साकळे घातले. स्थानिक दुकानदारांच्या मते, मंगळवारी ओटी भरण्यासाठी 10,000 पेक्षा अधिक महिलांनी देवीला साकडे घातल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. उल्लेखनीय असे की, शारदीय नवरात्रीत महिला भक्त अंबामाईची ओटी भरण्यासाठी आतुरतेने वाट पाहतात, कारण अंबा-एकविरा देवी भाविकांच्या नवसाला पावणारी असल्याने महिला श्रद्धेने ओटी भरण्यास प्राधान्य देतात. दुकानदारांकडून बांगड्या, ब्लाउज पीस, कुंकू, हळद, गजरे आदी वस्तू खरेदी करून मातेला भक्तीभावेने अर्पण केल्या जातात. अंबामाई संस्थानचे सुरेंद्र बुरंघे यांनी सांगितले की, यावर्षी नवरात्र हा 10 दिवसांचा उत्सव असल्याने संस्थानला भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे, आणि त्यानुसार व्यवस्था करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. सुरक्षा व्यवस्था राखण्यात आली असून पुरुष आणि महिला भाविकांसाठी देवीचे दर्शन तातडीने सुलभ केले गेले आहे. संस्थानने शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असून मर्यादित संख्येतील भाविकांसाठी मोफत अन्नदानही उपलब्ध आहे. दरम्यान, एकवीरा संस्थानचे सचिव चंद्रशेखर कुलकर्णी यांनी सांगितले की, पहिल्या दिवसापासूनच भाविकांनी मोठी गर्दी केली असून यावर्षी नवरात्री दरम्यान दोन मंगळवार आल्याने उत्साहात भर पडत आहे. पहिल्या दिवशी 4,000 आणि दुसऱ्या दिवशी मंगळवारी 4,400 भाविकांनी अन्नदानाचा लाभ घेतला.




