निम्न पेढी प्रकल्पातील नागरिकांना घरकुल मंजूर
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन

अमरावती /23 डिसेंबर : निम्न पेढी प्रकल्पात यावर्षीपासून पाणी साठविण्याची परवानगी देण्यात आली आहे. परिणामी गोपगव्हाण गावापर्यंत पाणी येणार आहे. त्यामुळे या गावातील स्थलांतरला वेग देण्यात आला आहे. त्यासाठी नागरिकांना राहण्यासाठी घरकुल मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आज निम्न पेढी प्रकल्पाबाबत आढावा घेण्यात आला. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी हातुर्णा, गोपगव्हाण, कुंडखुर्द, अळणगाव, कुंड सर्जापूर या गावातील नागरिकांच्या स्थलांतरणाचा आढावा घेतला. नागरिकांनी पुनर्वसित गावात स्थलांतरण करावे, यासाठी त्यांना प्राधान्याने घरकुल मंजूर करण्यात येत आहे.
यासाठी त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता देण्यात येणार आहे. त्यासोबतच स्थलांतरासाठी दोन लाख रूपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. गावातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यात येणार असून, विजेची समस्या निकाली काढण्यात येणार आहे. पाण्याचा प्रश्न असलेल्या गावात विंधनविहिरी घेण्यात येणार आहे. बुडीत क्षेत्रात जाणार्या गावामधील स्थलांतराला वेग देण्यासाठी पुनर्वसित गावात प्रामुख्याने पाण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच पुनर्वसित गावात पायाभूत सुविधांसाठी 57 कोटी रूपयांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. ही कामे मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. कुंड सर्जापूर येथील स्मशानभूमीच्या विकासासाठी निधी देण्यात आला आहे. जागाही ठरविण्यात आली असून येत्या काही दिवसात याठिकाणी कामे करण्यात येतील. स्थलांतरण वेगाने व्हावे, यासाठी घरकुल मंजुरीचे पत्र आणि पहिला हप्ताही तातडीने देण्यात येणार आहे. तसेच स्थलांतरणाच्या भत्त्यासाठी नागरिकांचे अर्ज घेण्यात येणार आहे. यावेळी सरपंच यांनी पुनर्वसित गावात येणार्या समस्यांची माहिती दिली.




